केवळ काहीतरी रोज लिहायचं म्हणून लिहिणारे असे कितीक असतील आणि मनातलं कागदावर ओथंबून देण्यासाठी लिहिणारे किती असतील? नुसती उगाच आकडेमोड नकोच. हल्ली लोकांना फार लवकर राग येतो आणि तो लवकर व्यक्त सुद्धा होतो. तर्कावरून सुरु झालेला प्रवास तर्कशुद्ध विवेचनावरच थांबतो असं तर अजिबातच होत नाही. काल एका मराठी वृत्त वाहिनीवर हैदराबाद मध्ये कन्हैया कुमार वर चप्पल फेकली गेली त्यावर चर्चासत्र बघितलं. इतके खुजे लोक राजकारणात आहेत आणि असं विषारी राजकारण करतात हे बघून वाईट तर वाटलच पण आपल्या देशाच्या गौरवशाली परंपरेबद्दल ह्या लोकांच्या मनात किती भ्रामक समजुती आहेत, याचादेखील प्रत्यय आला.
मुळातच विद्यार्थी चळवळ हि काही आज किंवा काल सुरु झालेली चळवळ नाही. तिला देखील काही इतिहास आहेच. आजच्या राजकारणात मुरलेली मंडळी जेव्हा इतका विखारी विद्यार्थी द्वेष व्यक्त करतात तेव्हा आश्चर्यापेक्षा त्यांची मला कीवच जास्त येते. एका विद्यार्थ्याने तुम्हाला एवढं जेरीस आणलं आहे कि त्याच्यावर तुम्ही आता चप्पल देखील फेकतात, त्याला जीवे मारायची धमकी देतात, हात पाय तोडणे यासारख्या फुटकळ घोषणा करतात आणि त्याला तुमचे तितकेच महामूर्ख कार्यकर्ते आदेश समजून तत्काळ त्या अमलात देखील आणतात यापेक्षा हास्यास्पद राजकारण आजपर्यंत या देशाने तरी पाहिलेले नाही.
महाराष्ट्रात आणि पुण्यात, ते देखील फर्ग्यूसन सारख्या महाविद्यालयात देखील काल जो प्रकार झाला तो निंदनियच. स्वतःचं हसं करून घ्यायची जर एवढी खुमखुमी सत्तेत असलेल्या पक्षाला आहे तर ती त्यांनी खुशाल मोकाटपणे करावी, पण विद्यार्थ्यांच्या मानगुटीवर बसून नाही. आजचा विद्यार्थी हा उद्याचा सुजाण नागरिक आहे आणि जर त्याला तुम्ही तुमच्या दबावतंत्राने मारून-मुटकून अशी शिस्त लावायचा प्रयत्न करत असाल, तर तो सोडून द्या. आता तो काळ सरला जेव्हा एखाद्या नेत्याला शिरसावंद्य मानून त्याच्या प्रत्येक शब्दाला नागरिक अलगद आपल्या मनाच्या हिंदोळ्यावर झुलवायचे. आता 'स्मार्ट' पिढी तयार झाली आहे. आम्हाला डोळे, कान आणि आमची स्वतःची शाबूत अशी विचारशक्ती आहे. तुमचं राजकारण कळण्याइतपत बुद्धी तर नक्कीच आहे. किती रोहित, कन्हैय्या आणि उदय यांना तुम्ही रोखाल? अजून किती काळ? आमचं राष्ट्रप्रेम फक्त पाठ्यपुस्तकातल्या स्वातंत्र्य चळवळीपुरता मर्यादित नाही किंवा सीमेवर देशासाठी शहीद होणाऱ्या सैनिक बांधवांपुरता देखील मर्यादित नाही. दिखाऊपणा करणाऱ्या कुठल्याही दांभिक विचारधारेचा आम्ही अट्टहास धरत नाही. धर्माच्या, जातीयतेच्या, लिंगभेदाच्या भिंती ओलांडून आमच्या प्रेरक विचारसरणीचा जन्म झालेला आहे. त्यामुळे अजून किती काळ या देशातले नेते आणि स्वयंघोषित विद्यार्थ्यांची माता आम्हाला लहान मानून आमचे विचार खोडून टाकायचा प्रयत्न करणार आहेत? असाल तर सोडून द्या. तुम्हाला आता यापुढे नवीन आव्हानं आमच्या रूपातच बघायला मिळतील.
Comments
Post a Comment