आज मी बऱ्याच दिवसांनी ट्रेनचा प्रवास केला. तसा नेहमीच करते, पण आज पुस्तक वाचता- वाचता गर्दी कमी असल्याकारणाने बाहेर खिडकीतून बघायला मिळालं. काही विचार डोक्यात आले. जिथे उतरले तिथून ज्या रस्त्यावर पायपीट करायला सुरुवात केली तिथे ताम्रशिंबी अर्थात कॉपर पॉड ची ओळीने लावलेली असंख्य झाडं रस्ताभर मला साथ करत होती. पिवळ्या रंगाची अशी उधळून पाहून मन प्रसन्न झालं. मला उगाच त्या रस्त्यावरून परत येता जाता फिरायला आवडेल असं वाटून गेलं. मी मुंबईतल्या फोर्ट भागातल्या छोट्या रस्त्यांवर अशीच फिरते. एकटीने चालायला मला फार आवडतं. डोक्यात असंख्य विषय असतात, त्यांच्याशी एक द्वंद सतत चालू असतं. चेहरा निर्विकार ठेवून फिरणं आता मला जमतं. पूर्वी मी करत असलेल्या विचारांनी फार गुंगून गेल्यामुळे माझ्या चेहऱ्यावर त्रासिक भाव फार पटकन उमटायचे. आता थोडं शहाणपण आलंय. आज रस्त्याने चालताना, ऐन उन्हात त्या पिवळ्या फुलांनी बहरलेल्या झाडांनी फार आत्मिक समाधान आणि शांतता दिली माझ्या विचलित चित्ताला. गेल्या कित्येक दिवसांपासून सारखं माझी फार घालमेल होतेय, सतत अजून न घडणाऱ्या गोष्टींनी मला फार चिंतातूर केलंय. कोणाशी बोलून मन मोकळं करायचा पण पर्याय नाही. कोणाला सांगणार आणि काय? लिहून देखील मनातल्या भावनांना वाचा फुटत नव्हती, ती आज एका उन्हातल्या चालण्याने झाली. खरंच आहे तर, आपण सतत कुठल्यातरी ध्यासाचा पाठलाग करत असतो आणि त्याच्या पाठीमागे धावता धावता आपली दमछाक होते, सैरभैर होतो आपण पण थांबत मात्र नाही. कारण थांबण्यात आपल्याला कमीपणा वाटतो, किंबहुना आपण कधी थांबायचा विचारच करत नाही. लहानपणापासून आपल्या मनावर बिंबवलं जातं, जो थांबला तो संपला म्हणून आपण कधी विश्रांती घेतंच नाही. असो.
इतक्या उन्हात लांबवर मी चालत होते आणि विचारांची घोडदौड देखील सुरूच होती. तितक्यात एका लायब्ररीचा बोर्ड बघितला दुरूनच. नवीन चष्मा घेतल्यापासून आता मला लांबचं अगदी छान दिसतं. बोर्ड बघूनच मी खुश झाले आणि तत्परतेने आत गेले सुद्धा. तिथे पुस्तकांच्या रांगा बघून छान वाटलं. छोटीशीच जागा, त्यामुळे अगदी गर्दी करून दाटीवाटीने पुस्तकांना तिथे मांडलेलं बघून अगदी आनंदाची उडी मारली मी मनातल्या मनात. पुस्तकांच्या सानिध्यात तर अगदी टळटळीत दुपार देखील अगदी मजेत सरून जाते माझी.
आज खूप मोकळा श्वास घेतला मी त्या पिवळ्या फुलांच्या सोबतीत. तसंच त्यांना बघत अखंड चालत राहिले असते मी. मनभर पसरला तो रंग. गुलमोहराचा लाल असाच मनाला एक उभारी देतो, शब्दांच्या हिंदोळ्यावर मन झुलायला लागले. मला फक्त एक उनाड मोकळा रस्ता आणि त्याच्या दुतर्फा निळ्या आकाशाच्या कॅनव्हासवर डुलणारी पिवळी फुलं साद देत होती.
आज खूप मोकळा श्वास घेतला मी त्या पिवळ्या फुलांच्या सोबतीत. तसंच त्यांना बघत अखंड चालत राहिले असते मी. मनभर पसरला तो रंग. गुलमोहराचा लाल असाच मनाला एक उभारी देतो, शब्दांच्या हिंदोळ्यावर मन झुलायला लागले. मला फक्त एक उनाड मोकळा रस्ता आणि त्याच्या दुतर्फा निळ्या आकाशाच्या कॅनव्हासवर डुलणारी पिवळी फुलं साद देत होती.
Comments
Post a Comment