आज २७ फेब्रुवारी. कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आणि मराठी भाषा दिवस. त्यानिमित्त मला आवडणाऱ्या एका मराठी लेखिकेच्या पुस्तकाचं विवेचन इथे करते. गौरी देशपांडे- मराठी वाचणाऱ्या साऱ्याच वाचकांना हे नाव जितकं परिचित आहे तितकच फार जवळचं देखील आहे. मी सर्वप्रथम गौरी देशपांडे यांची एक कथा शाळेत असताना अभ्यासली होती- कलिंगड. आणि कित्येक दिवस मी त्या कथेच्या पुढे अजून काही असेल का म्हणून उत्सुक आणि अस्वस्थ होते. दहावीत असताना वाचली होती म्हणून त्यांचं सर्व लिखाण वाचून काढायचं हे ठरवलं. पुढची चार- पाच वर्ष त्यांचं असं काही वाचनात आलं नाही. नंतर 'आर्किटेक्चर' शिकताना कॉलेजच्या ग्रंथालयात मराठी पुस्तकांचं कपाट दिसलं. आणि पाहिलं पुस्तक जे मी घेतलं नी वाचलं ते गौरी देशपांडेंचं 'मुंबई-तळेगाव-ग्रीस' असा प्रवास करणारी 'मुक्काम' हि दीर्घ कथा/कादंबरी. त्याचं दुसरं पुस्तक वाचलं ते म्हणजे 'आहे हे असे आहे', आणि त्यात मला परत एकदा सापडली ती 'कलिंगड' हि कथा. मी चार-पाच वेळा ते पुस्तक वाचून काढलं परीक्षा सुरु होण्याच्या काही दिवस आधी, एप्रिल मधेच आणि त्या कलिंगडाची अवीट गोडी अनुभवली.
काही दिवसांपूर्वी घराजवळ असणाऱ्या लायब्ररीत गेले होते तेव्हा 'गौरी देशपांडे' ह्या नावाचं शेल्फ दिसलं. लगेच एक पुस्तक घेतलं आणि त्याचाच अनुभव इथे लिहितेय. पुस्तक होतं 'दुस्तर हा घाट आणि थांग.'
एखादी शोकांतिका वाचावी आणि मग उरातली सगळी बेचैनी, सगळ्या जुन्या आठवणी उसळी मारून वर याव्यात, असच काहीसं माझं झालं.
मी फार गुंतून जाते गौरी देशपांडेच्या सगळ्याच व्यक्तिरेखांमध्ये आणि नमू, भाई, वनमाळी, Alistair ही देखील याला अपवाद नव्हती.
खरंतर, आता त्यांची जवळजवळ सगळीच पुस्तकं मी वाचली आहेत पण तरीही प्रत्येक नवीन कथेत फार मोठं आयुष्याचं गमक मला आढळतं.
खूप भावनाविवश करतात हि सगळीच माणसं!
आणि हि सगळी मंडळी जरी त्यांच्या गुणदोषांसकट आपण स्विकारलीत ना, तरी मग त्यांच्या सर्व वागण्यावर आपल्याला कधी राग, तर कधी अपार प्रेम करावसं वाटतं. कधी हतबल देखील होतो आपण, नी कधी सगळचं त्यांच्यावर सोपवून आपण अगदी मुक्त पक्षी होतो.
एका स्त्रीची घुसमट, तिचं एकटेपण, तिच्या भावविश्वाचा इतका सुंदर उलगडा खचितच कुणी केला असेल. त्या तिच्या, कधी आनंदी तर कधी अतीव दुःखी अशा प्रवासाचा मागोवा आज तीस-चाळीस वर्षांनंतर देखील, एवढा प्रकर्षाने आपल्या मनाला भिडावा हे चांगलं कि आजच्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये काहीच कसा बदल झाला नाही म्हणून वाईट वाटावं? फार, फार, जटील प्रश्न मनाला पोखरून काढतील आणि त्यांची उत्तरं आपण शोधत राहू, असंच जीव मुठीत घेऊन जगताना!
मी जितकी वाचतांना गुंतले तितकंच गौरी देशपांडे ह्या लिहिताना गुंतल्या असतील का?
Comments
Post a Comment