काही लोकांना वेंधळेपणा करण्याची एवढी सवय जडली असते कि कितीही त्यांनी काळजीने काम करण्याचा प्रयत्नापुर्वक निश्चय केला तरीही तो कधी तडीस जात नाही. मला माहित असलेल्या काही वेंधळ्या माणसांबद्दल सांगायचं झालं तर त्याचं प्रत्येक काम किंवा कृती हि इतरांसाठी तापदायकच ठरते बहुतेक वेळा. म्हणजे विद्यार्थ्यांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर त्यांना परीक्षेत अभ्यास आठवेल का याचं टेन्शन असतं पण तरीही त्यातल्यात्यात त्यांच्या वेंधळेपणात कुठेही कसूर रहात नाही. अगदी परीक्षेची सामग्री नीट घेण्यापासून ते ओळखपत्र, परीक्षेत व्यवस्थित पेपर लिहिण्यापर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये यांचा धांदरटपणा दिसून येतो.
अशा लोकांच्या बेजबाबदार वागण्याची किंमत त्यांच्या परीजनांना भोगावी लागते याचं त्यांना सोयरसुतक देखील नाही. शेवटी काय तर माणूस स्वतःच्या स्वार्थाचाच विचार करतो. मला तर अतिशय राग आहे अशा लोकांच्या आप्पल्पोटेपणाची. त्यांच्या जगाचे ते राजे, सगळं भूमंडल फक्त यांच्या अवतीभवतीच फिरत असल्याचा यांचा फाजील गोड गैरसमज. आपल्यामुळे समोरच्याला केवढा मानसिक त्रास सोसावा लागत असेल याचा थांगपत्तासुद्धा अशा लोकांना नसतो मुळातच. कुठल्यातरी आभासी दुनियेत जगात असतात ती रममाण होऊन. स्वतःच्या इच्छा- आकांक्षा जाऊद्या पण यांच्यासाठी आयुष्यभर खस्त्या खाणाऱ्या त्यांच्या प्रियजनांच्या कष्टाचं मोल अशी लोकं स्वतःच्या नाकर्तेपणाचे दाखले देऊन करतात. वरून शिरजोरी ती अशी कि हा त्यांचा हक्कचं होता.
अशा लोकांच्या सतत सहवासात असल्याकारणाने मग इतरांची देखील घुसमट होऊ लागते, फक्त ती काहींना व्यक्त करता येते, तर काही आतल्या आत घुटमळत रहातात. आपण तरी किती सहानुभूती दाखवणार अशा जगण्यावर? फक्त कुठे असं लिहून थोडा मोकळा श्वास आपल्याला घेता येतो, तो घेत रहायचा आपण.
Comments
Post a Comment