आज आमच्याकडे चार दिवस पाणी नसल्याकारणाने पाण्याची भीषण दाहकता प्रत्यक्षात फर्स्ट hand अनुभव करतोय. इतके दिवस मराठवाड्याला पाणी नाही, शेतकरी कुटुंबांची हतबलता फक्त पेपर मध्ये, बातम्यांमधून वाचत, ऐकत होतो. आज तीच परिस्थिती आम्हा शहरी भागात राहणाऱ्या लोकांवर आल्यामुळे खरं जगण्यातली विवशता आज आम्हाला कळतेय. आपण शहरी लोक फारच लाडावलेलो आहोत. जगण्याच्या सगळ्या सुविधा अक्षरश: लोटांगण घालतात आपल्यासमोर म्हणून अर्थातच आपल्याला किंमत नाही कसलीच. ह्याच जीवनोपयोगी गोष्टींसाठी जेव्हा जबर लढा द्यावा लागतो ना, तेव्हा त्यातली भयाण अस्वस्थता समोर येते.
आज पिण्यासाठी देखील पाणी नाही म्हणून जेव्हा दुकानातून काही लिटर्स मध्ये पाणी विकत आणायला लागलं तेव्हा अर्धा ग्लास पाणी पिऊन ते फेकून टाकणाऱ्या असंख्य लोकांचे चेहरे माझ्या डोळ्यासमोरून तरळून गेले. आपण सगळेच बेफिकीरीने वागतो. किंबहुना आपल्या वागण्याचं समर्थन आपल्याला द्यावं लागत नाही एखाद्या एजन्सीला किंवा पर्यावरण watch संस्थेला म्हणून पण हा स्वभाव झाला. यात चुकीचं काहीच नाही हीच आपली मानसिकता. माझ्या थोड्याशा पाण्याच्या अपव्ययामुळे कुठे एवढा फरक पडतोय ना, हीच आपली विचार करायची तऱ्हा. निदान आतातरी, पाण्याचे युद्ध पेटण्याची चिन्हं दिसत असताना आपण काळजी घ्यायला सुरुवात करूयात. सण असला आणि तो वर्षातून एकदाच जरी साजरा होत असला तरी आपल्याच भविष्याचा विचार करून पाणी जपून वापरा, फटाक्यांवर नियंत्रण ठेवा, जेवढी जमेल तेवढी उर्जा वाचवा. आपल्याला अजून बरीच वर्ष ह्या ग्रहावर राहायचं आहे, निदान सामान्यांना तरी. पैसेवाले शोधतील हो नवीन ग्रहसृष्टी त्यांच्यासाठी!
Comments
Post a Comment