वारा देखील मनातल्या आठवणींना पिंगा घालत होता. मला आठवला पावसाळ्यातला तो दिवस जेव्हा आम्ही पहिल्यांदा या नवीन घरी पाऊल टाकलं होतं. नुकत्याच सरी येऊन गेल्या होत्या आणि सगळा आसमंत मातीच्या घमघमाटात प्रसन्न भरला होता. झाडांवर पावसाचा शिडकावा इतका आल्हाददायी भासला होता. पूर्वी कधीच इतकं जवळून निसर्गाशी एकरूप होण्याची संधी मिळाली नव्हती. ती इथे आम्हाला पुरेपूर उपभोगता आली. इथला प्रत्येक ऋतू आणि त्यातली संथता, या आधी घड्याळाच्या तालावर नाचत असताना जी आमच्या हातून निसटली होती त्या निरव शांत जगण्यात आम्हाला घेऊन गेली. सप्टेंबर मध्ये कोसळणारा पाऊस, ऑक्टोबर ला सुरु होणारी सौम्य थंडी, डिसेंबर ते फेब्रुवारी पर्यंत कुडकुडणारी तरी आवडणारी गोठवणारी थंडी, मार्च ते मे पर्यंत अगदीच उकाडा नाही पण उन्हाळा आहे याची जाणीव करून देणाऱ्या या असंख्य मोसमातल्या बदलांचा आम्ही अनुभव घेतला. इथे आल्यापासून मी परत एकदा रंग आणि कुंचला हातात घेतला, मनातल्या साऱ्या तरल अनुभूती कॅनव्हासवर उमटल्या; कधी रेषा, रंग आणिक शब्दांच्या रूपात. रोज संध्याकाळी आणि रात्री रेडिओवर जुनी गाणी ऐकताना परत त्यातली गोडी अनुभवली. इथे आल्यावर जणू अंतर्मनाने देखील मोकळा श्वास घेतला. एका लांब सतत चाकोरीबद्ध दैनंदिनीत अडकलेल्या मनाला आणि शरीराला देखील नवीन पालवी फुटली एका अर्थाने.
चालता चालता इतके विचार मनात रुंजी घालत होते... त्या सर्वांनाच शब्दात इथे मांडणं शक्य नाही पण इतकं साधं असतं आयुष्याला जगणं हे मी शिकले. सतत ध्येयांचा मागोवा करण्यापलीकडे आणि भासांच्या पल्याड देखील जगणं सुकर होऊ शकतं, हे जाणवलं. किती विविध राग रंग आहेत आपल्या असण्याला आणि त्या सर्वांचा थोडा परिचय मला करून घेता आला एवढ्या अवधीत. भर दुपारी उन्हाच्या तीव्रतेला घरातल्या सावलीतून बघताना मनातल्या गुंत्याला देखील मोकळं करता आलं. रात्री झोपताना खिडकीतून अवचित कधीतरी दिसणाऱ्या चांदण्यांनी भरलेल्या आभाळाला देखील स्पर्श करता आला, आणि सकाळी याच गच्चीवर फिरताना झाडांशी गुजगोष्टी करता आल्यात. खरंच किती सुख आहे! असेच दिवस फुलत राहो आणि हे जीवनगाणे आपण सदैव गात राहो!
Comments
Post a Comment