Skip to main content

आठवणीतल्या पाऊस गोष्टी!

गेल्या आठवड्यापासून पाऊस सगळीकडे चांगलाच पडतोय आणि हळूहळू पावसावरचे लेख देखील वाचण्यात येऊ लागलेत. मला फार पूर्वीपासूनच पावसात भिजणं आवडत नाही. कॉलेजच्या दिवसांत देखील ट्रेनने प्रवास करताना अनेकवेळा चिंब भिजून त्या गर्दीत चढताना जीव नकोसा व्हायचा. मला सर्दी लवकर होते म्हणून देखील मी पावसात भिजणं कटाक्षाने टाळते. तर आज हा इथे लिहिण्याचा उहापोह यासाठी की एका मैत्रिणीने तिच्या पावसाळी दिवसांच्या भुट्टा खाणाऱ्या आठवणी लिहिल्यात आणि त्या वाचून मी देखील काही क्षण त्या सुंदर गतकाळात स्थिरावले. 

एके दिवशी पावसात चिंब भिजून कॉलेजला पोहोचले तर तिथे आमचा स्टुडिओच गळत होता. सगळीकडे फरशीवर पाणी आणि त्या अंधारलेल्या जागेत आम्ही मिळेल त्या कोरड्या जागेत बसलेलो मला आजही लक्ख आठवतंय. 

नंतरच्या आठवणी ह्या जेजेतल्या हिरव्या पटांगणावर पडणाऱ्या पाऊसधारा बघण्याच्या आणि नाचत उड्या मारत पावसाला चकवत स्टुडिओ ते कॅन्टीनला पळण्याच्या ह्या होत्या. 


इंटर्नशिपच्या काळात व्हीटी ते कुलाबा बहुतांशी मी पायीच प्रवास करायचे. तेव्हा छत्री सांभाळत, हातातलं पुस्तक भिजू न देता, इतर लोकांना चुकवत तो रस्ता चालताना देखील वेगळीच मजा होती. मी हमखास ओले व्हायचे आणि मग ऑफिसला जाऊन दिवसभर त्या एसीमध्ये कुडकुडायचे. कधीतरी एसी बंद करून समोरच्या खिडकीतून दिसणाऱ्या आमदार निवास भवती लोकांच्या गर्दीला त्या उंचीवरून बघायचे. त्या ऑफिसमधल्या खिडकीतून मी कितीतरी अनामिक चेहऱ्यांच्या लोकांना दिवसभर पायपीट करताना बघितलंय. त्या लहानशा खोलीत येणारे आवाज ऐकत, कॉम्प्युटरवर काम करताना तेव्हा एक विलक्षण शांतता लाभली. ती परत मी अनुभवली एका आसपास जंगल सदृश्य  वस्ती असणाऱ्या वातावरणात काम करताना. इथे पावसाला चकवता येणं शक्यंच नव्हतं आणि अजूनही नाही. आता तर सगळेच आपण घरून काम करतोय पण ती २-३ वर्षं फार सुखकारक होती. मध्यंतरीच्या काळात मैत्रिणीला किताबखानाला भेटताना हमखास वेळ असायचा म्हणून मी फाऊंटन येथल्या पुस्तकविक्रेत्यांकडे चक्कर टाकायचे. पावसाळ्यात देखील त्यांच्याकडे त्या टारपोलीनने झाकलेल्या पुस्तकांवरून नजर फिरवण्यात एक वेगळीच गंमत होती.  


२०१८ मध्ये पॉंडिचेरीला असताना अनपेक्षितपणे आलेल्या पावसाने जी त्रेधा उडवली होती ती देखील अजून माझ्या स्मरणात आहे. माझ्यासोबत असणाऱ्या इतरांनी जरी मजा घेतली होती तरी मुंबईच्या बाहेर एवढ्या दूर पावसाचं ते रौद्ररूप पाहून मी बरीच घाबरले होते. अगदी साधारण दशकभरापूर्वी, २००९ मध्ये माझ्या पहिल्या पाँडिचेरी भेटीत देखील जानेवारीत मला पावसाने गाठलं होतंच. 


महाबलीपुरमला पोहोचता पोहोचता बसच्या बाहेर देखील काही दिसू नये एवढा मुसळधार पाऊस तिथे पडत होता. अगदी इच्छा नसताना बस मधून उतरून चिखलात स्वतःला सावरून काही वेळ मी फिरले होते. आणि मग, पुढचे दोन दिवस ड्रायरने असंख्य प्रयत्न करून देखील न वाळणारे ओलेचिंब बूट घालून तो पुढचा प्रवास मी केला होता. तसाच अनुभव एकदा डिसेंबर मध्ये कलकत्त्यात असताना आला. सकाळी मी मेट्रोने व्हिक्टोरिया मेमोरियल जवळ पोहोचले आणि तेवढ्यात ढगांच्या गडगडाटात पाऊस माझ्या समोर उभा ठाकला. सोबत छत्री नव्हती, होती ती फक्त एक बॅग आणि पुस्तक. ती दोघंही भिजू नयेत म्हणून माझी उगाच केविलवाणी धडपड चालू होती. शेवटी पुस्तकाला कवटाळत मी एके ठिकाणी थांबले आणि कलकत्याच्या त्या पावसात तो सबंध दिवस मी कॉफी पित काढला. 

माझ्या जर्मन मैत्रिणीला मी मुंबईच्या पावसात गेटवेला एकदा भेटले आणि मग आम्ही दोघी अधूनमधून बरसणाऱ्या सरींसोबत पायपीट करत चर्चगेटला विळखा घालत K Rustom's च्या बाहेर उभं राहून त्यांच्या आईस्क्रीम सँडविचला मिटक्या मारत खात होतो बराच वेळ. तिच्यासोबत मरीन ड्राईव्हवर चालत फेसाळत्या समुद्राला बघत केलेल्या गप्पा अजूनही मनाला तजेला आणतात.


नंतर बऱ्याच वर्षांनी, तिच्या मायदेशी तिच्या शहरात पावसात भिजत कॅफे मध्ये खालेल्या केकच्या आठवणी अजूनही माझ्या मनात रेंगाळताय.   

मुंबईच्या मुसळधार पावसाला चुकवून मी बर्लिनचा सौम्य पाऊस चांगलाच अनुभवला. इथे लोकांना कसलीच घाई नव्हती... ना ट्रेन बंद पडण्याची चिंता, ना पावसात अडकण्याची काळजी. सगळंच किती शांत आणि स्थिरावलेलं जगणं. मी हा पाऊस रेकॉर्ड करत होते फोनवर आणि अशा वेळी माझी मैत्रीण मात्र मुंबईच्या पावसाला आठवत होती. तिच्या मित्रमैत्रिणींच्या कंपूला याच पावसात भेटले आणि त्यांनी मला अनेक गप्पांमध्ये त्यांच्या शहराची सफर घडवली. माझ्या दूरदेशी असणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत पावसाळी रात्री केलेल्या Google Hangouts चे अनेक किस्से, त्यांना खिडकी उघडून दाखवलेला त्या रात्रीच्या अंधारात पडणारा पाऊस आणि कडाडणाऱ्या विजा, आणि अशा कित्येक आठवणींचा आता महापूर माझ्या डोळ्यांत साठलाय. कितीतरी गुजगोष्टी आणि गेल्या कित्येक वर्षांत भेटलेल्या, न भेटलेल्या लोकांचे चेहरे मनात तरळले. पावसाची आता इथे रिपरिप चांगलीच वाढलीय आणि चहा प्यायची माझी तलफ सुद्धा! नेमेचि येतो पावसाळा तरी त्या आठवणींसाठी मात्र असा एक दिवस विशेष यावा लागतो! 


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

या जन्मावर, या जगण्यावर...शतदा प्रेम करावे?

पुस्तकांच्या आणि निसर्गाच्या साथीत जेवढा वेळ छान जातो आणि सार्थकी लागल्यासारखा वाटतो तितका खचितच कुठेतरी अन्यत्र वाटतो. नवीन वर्षात केलेल्या संकल्पांपैकी एक म्हणजे वाचलेल्या प्रत्येक पुस्तकावर स्वतःचं विवेचन लिहिणं. सुरुवात तर झाली आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आणि वर्ष अखेरीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या बऱ्याच बुक स्टोर्सनी भर भक्कम डिसकाउंट जाहीर केला होता. मी देखील नाही नाही म्हणता लोभाला भुलून पार ATM मध्ये जाऊन पैसे काढून पुस्तकं खरेदी केलीत वर्षाच्या शेवटच्या दिवशी. टिव्ही वरच्या असंख्य कार्यक्रमांवर नजर फिरवल्यास असं चित्र दिसतं कि समाजाच्या नैतिक मूल्यांशी कार्यक्रम बनवणाऱ्यांच काहीच घेणं-देणं दिसत नाही. माणसांची पतच एवढी रसातळाला गेली आहे कि कपोलकल्पित आणि वास्तव जग यांची चांगलीच सरमिसळ आपण करून ठेवली आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचे आपले काहीच मनसुबे वाटत नाही. आज सकाळी विचार करता करता माझ्या असं लक्षात आलं कि आपण किती उगाच खलबतं करतो, आपला दुरान्वये संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल. काल रात्री जेवताना मी कुमार केतकरांचं "बदलते विश्व" हे साधारण दहा वर्षांपूर्व

गौरी देशपांडे आणि मी

आज २७ फेब्रुवारी. कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आणि मराठी भाषा दिवस. त्यानिमित्त मला आवडणाऱ्या एका मराठी लेखिकेच्या पुस्तकाचं विवेचन इथे करते. गौरी देशपांडे- मराठी वाचणाऱ्या साऱ्याच वाचकांना हे नाव जितकं परिचित आहे तितकच फार जवळचं देखील आहे. मी सर्वप्रथम गौरी देशपांडे यांची एक कथा शाळेत असताना अभ्यासली होती- कलिंगड. आणि कित्येक दिवस मी त्या कथेच्या पुढे अजून काही असेल का म्हणून उत्सुक आणि अस्वस्थ होते. दहावीत असताना वाचली होती म्हणून त्यांचं सर्व लिखाण वाचून काढायचं हे ठरवलं. पुढची चार- पाच वर्ष त्यांचं असं काही वाचनात आलं नाही. नंतर 'आर्किटेक्चर' शिकताना कॉलेजच्या ग्रंथालयात मराठी पुस्तकांचं कपाट दिसलं. आणि पाहिलं पुस्तक जे मी घेतलं नी वाचलं ते गौरी देशपांडेंचं 'मुंबई-तळेगाव-ग्रीस' असा प्रवास करणारी 'मुक्काम' हि दीर्घ कथा/कादंबरी. त्याचं दुसरं पुस्तक वाचलं ते म्हणजे 'आहे हे असे आहे', आणि त्यात मला परत एकदा सापडली ती 'कलिंगड' हि कथा. मी चार-पाच वेळा ते पुस्तक वाचून काढलं परीक्षा सुरु होण्याच्या काही दिवस आधी, एप्रिल मधेच आणि त्या कलिंगडाची

वेंधळेपणा

काही लोकांना वेंधळेपणा करण्याची एवढी सवय जडली असते कि कितीही त्यांनी काळजीने काम करण्याचा प्रयत्नापुर्वक निश्चय केला तरीही तो कधी तडीस जात नाही. मला माहित असलेल्या काही वेंधळ्या माणसांबद्दल सांगायचं झालं तर त्याचं प्रत्येक काम किंवा कृती हि इतरांसाठी तापदायकच ठरते बहुतेक वेळा. म्हणजे विद्यार्थ्यांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर त्यांना परीक्षेत अभ्यास आठवेल का याचं टेन्शन असतं पण तरीही त्यातल्यात्यात त्यांच्या वेंधळेपणात कुठेही कसूर रहात नाही. अगदी परीक्षेची सामग्री नीट घेण्यापासून ते ओळखपत्र, परीक्षेत व्यवस्थित पेपर लिहिण्यापर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये यांचा धांदरटपणा दिसून येतो. अशा लोकांच्या बेजबाबदार वागण्याची किंमत त्यांच्या परीजनांना भोगावी लागते याचं त्यांना सोयरसुतक देखील नाही. शेवटी काय तर माणूस स्वतःच्या स्वार्थाचाच विचार करतो. मला तर अतिशय राग आहे अशा लोकांच्या आप्पल्पोटेपणाची. त्यांच्या जगाचे ते राजे, सगळं भूमंडल फक्त यांच्या अवतीभवतीच फिरत असल्याचा यांचा फाजील गोड गैरसमज. आपल्यामुळे समोरच्याला केवढा मानसिक त्रास सोसावा लागत असेल याचा थांगपत्तासुद्धा अशा लोकांना नसतो मु