(Artwork by Jonathan Kwegyir Aggrey)
रविवारी वर्तमानपत्रात 'इस्तंबुलचा सुगंध' म्हणून एक लेख वाचला. त्यातली छायाचित्रं पाहून मला ओरहान पामुक यांच्या 'इस्तंबूल' या पुस्तकाची प्रकर्षाने आठवण झाली. आणि वाचता वाचता माझा कुठल्यातरी गोष्टीवरून बहिणीशी खटका उडाला, हे लिहिताना माझा हात किती कापरा झालाय. सर्वांची दृष्टी निराळी हे मान्य पण एखाद्या गोष्टीवर एवढी टोकाची भूमिका का असावी? आपल्याला न पटणाऱ्या गोष्टी ऐकून घेण्यात काय वाईट आहे? किंबहुना हा समजूतदारपणा दाखविण्याचा थोडा प्रयत्न तरी आपण करू नये का?
बघता बघता नवीन वर्षाचा पहिला महिना संपला सुद्धा. वाचायला तर खूप काही घेतलय, लिहायला देखील, ते कागदावर मांडायला हवं तेवढं वेळेवर. बऱ्याचदा गोष्टी मनातच राहून जातात, त्या सांगितल्या जात नाहीत, मग त्यांची घुसमट होते, त्या तिथेच दबल्या जातात. एखाद्या नॉस्टाल्जिक संध्याकाळी मग त्या आपल्याला आठवतात. त्यावर आपण मनातल्या मनात तेव्हाही उहापोह करतो पण त्या व्यक्त होतच नाही. ही आठवण मग कितीतरी वर्ष आपल्याला सतवत राहते. आणि कधीतरी मग अशी कागदावर उतरते. सांगायचच झालं तर पामुक. मला लेखक म्हणून अतिशय आवडणारा माणूस, आणि म्हणूनच एकाद्या घनिष्ट मित्रासारखा वाटणारा. त्याच्या बोस्फोरस नदीकाठच्या फेऱ्या मला माझ्या मरीन ड्राईव्हवरच्या बैठका वाटतात. समुद्राला बघत विचार करण्यात जो एक दुर्दम्य आशावाद मनाला उभारणी देतो तो अन्यत्र कुठे मला मिळत नाही. कुठेतरी माझी आनंदाची व्याख्या आणि संकल्पना चुकते असंही वाटतं. पण आपण किमान बरोबर व चूक यातला फरक ओळखण्याइतपत सुजाण नाही का झालेलो? वास्तव आणि कपोलकल्पित यांत सध्या किती सूक्ष्म अंतर राहिलंय. आपण आभासी दुनियेत वावरतोय, आणि त्यात किती गुरफटलोय याचं देखील भान आपल्याला उरलेलं नाही. भौतिक गोष्टींचा हव्यास आणि आत्ममग्नता यामध्ये आपण स्वतःला अडकवून ठेवलय. सगळ्या गोष्टींना एक किंमत ठरवलीय आणि तिला अवाजवी महत्व प्रदान केलय. आज मला दु:खी वाटतंय म्हणून मी एखादं आनंदी गाणं ऐकते आणि त्या दु:खाला क्षणिक निरोप देते. पण ते दु:ख परत येतच आणि आपण त्यात गुंतून राहतो. कितीतरी काळ असा हा छुपा संघर्ष आपण करत असतो, मनातल्या मनात. शारीरिक व्याधींनी जितके आपण त्रस्त असतो, त्याहून कैक पटीने मानसिक विकारांनी आपण गांजले जात आहोत. यावर उपाय काय?
म्हणून मनातलं मनमोकळेपणाने व्यक्तं करावं कधीतरी, व्यस्तं पळणाऱ्या आयुष्यातून. आपल्या भावनांना वाट करून देणं थोडं कठिणच पण अशक्य नाही. माझ्या मनात पामुकचे शब्दच रुंजी घालायला लागतात. समुद्रावर फिरत असताना, लाल नभाकडे पाहताना जे हृदयात गाणं उमटतं त्याला सूर द्यावा आणि पक्ष्यांच्या थव्याला दूरवर उडतांना नाहीसे होईपर्यंत बघत आपली नवीन वाट आपण रेखावी. आपला आनंद आपणच शोधावा आणि तो जगावा सुद्धा एखाद्या आनंदयात्री प्रमाणे!
Comments
Post a Comment