आज अप्पांचा वाढदिवस! ब्यांशी वर्षांचे झाले असते अप्पा, आज ह्यात असते तर.
तीन- चार दिवसांपासून मी अप्पांचा विचार करतेय. या वर्षी, २०२० मध्ये अप्पांना जाऊन १५ वर्षं होतील! सरलीत वर्ष... हळूहळू, कधी फार भरभर. इतके मोठे आम्ही कधी झालो गेल्या दशकात हे उमगलंच नाही. माणसं स्मृतीच्या कुपीत बंद होऊन जातात. कधी आपल्या समोर असतात तरीही विस्मृतीत दाखल होतात. हा स्मृतीचा खेळ फार जीवघेणा आहे. आपल्या नकळत लोकं आपल्या स्मृती पटलावर येऊन ठिय्या मांडतात आणि काही कधीच धूसर होत नाही. जे आता आपल्या सोबत नाहीत, मनाला त्यांची आठवण किती व्याकुळ आणि बेचैन करते. सतत वाटत राहतं- आज अप्पा असते तर गोष्टी किती वेगळया घडल्या असत्या. शेवटी, मन ते! असंख्य गुंतण्याची सवय त्याला. येनकेन प्रकारे स्वतःला रमवण्यात धन्यता मानतं. कुणी असो-नसो, मनाला साथ मिळते ती फक्त आठवणींची.
काही वर्षांनी, कदाचित या आठवणींची धार पुसट होईल. तेव्हा देखील मी अशीच भावनावश होऊन लहानपण आणि त्यातलं रम्यपण कुरवाळीन. अप्पांची प्रेमळ हाक, आम्हाला बघताच पेपर दूर सारून गेट जवळ येऊन आम्हाला घट्ट कवेत घेणं; संध्याबाई, अलकाताई अशी आपल्या मुलींना नाव घेत विचारपूस करणं...सारं काही फक्त आमच्या स्मृतीत. त्या काळी व्हिडियो रेकॉर्डिंग करणं फारसं प्रचलित नव्हतं. आता वाटतंय, आमच्या अप्पांचा निदान आवाज तरी आम्ही रेकॉर्ड करायला हवा होता. आपले जिवलग गेल्यावर त्यांची छबी, आवाज, त्यांचा घरातला वावर, त्यांनी वापरलेल्या वस्तू, वाचलेली पुस्तकं.. सगळंच अनामिक होऊन जातं! २००१ मध्ये आमचं बदलापूरला जेव्हा नवीन घर झालं तेव्हा कामगारांवर देखरेख करायला जवळपास १५-२० दिवस अप्पा आले होते. रोज दुपारी शाळेतून आल्यावर दार उघडायला तेच समोर असायचे. किती प्रसन्न हसून स्वागत करायचे. खिडकीशेजारी पुस्तकांच्या शेल्फजवळ ते एका खुर्चीत बसलेले असायचे. हीच त्यांची अखेरची छबी माझ्या मनावर कोरली गेलीय. त्यांनतर फार क्वचित ते घरी येऊन राहिलेत.
ते गेले, हेदेखील आम्हाला मध्यरात्री कळलं. १५ दिवसांपूर्वीच आम्ही त्यांना भेटून आलो होतो. माझ्या वाढदिवशी त्यांनी मला फोनवर शुभेच्छा देखील दिल्या होत्या. हेच आमचं शेवटचं बोलणं. दरवर्षी, त्यांच्या वाढदिवशी संक्रांत असते आणि दरवर्षी, मी त्यांच्या आता कधीच न साजरा केल्या जाणाऱ्या वाढदिवसाबद्दल विचार करते. अप्पा ६७ वर्षांचे असताना गेले. त्यांची पंचाहत्तरी आम्ही फार जोशात साजरी केली असती. तोपर्यंत आम्हीदेखील थोडे कमावत्या वयाचे झालो असतो. केवढा अभिमान आणि आनंद झाला असता त्यांना! आज जर ते असते, तर माझ्या यूरोप प्रवास आणि जर्मन वास्तव्याबद्दल त्यांना केवढं कौतुक वाटलं असतं. आज अप्पा असायला हवे होते. कितीतरी गोष्टी त्यांना सांगायच्या राहून गेल्यात, आमचे उडण्या-बागडण्याचे दिवस त्यांनी अजून बघायला हवे होते.
मनाला खूप काही उमगत नाही...त्या त्या वेळेत. मग असा आठवणींचा महापूर यावा लागतो, मनातला बांध सुटण्यासाठी!
Comments
Post a Comment