काही व्यक्तिरेखा चिरतरुण असतात आणि त्या सदैव जिवंत राहतात. माझ्या मनात चिरंतर घर करून राहिलेल्या काहींविषयी मी आज इथे लिहिणार आहे. साधारण अकरा वर्षांची असताना मी पहिल्यांदा चार्ल्स डिकन्स लिखित 'ऑलिव्हर ट्विस्ट' हि कादंबरी वाचली. माझ्याच वयाच्या असणाऱ्या एका अनाथ मुलाची ती कथा वाचताना नुसतेच माझे डोळे भरून आले नव्हते तर मी ढसाढसा रडले होते. त्याचे करुण डोळे मला सारखे माझ्या नजरेसमोर दिसायचे. जगात आपल्यासोबत आपली काळजी घेणारं कुणी नसलं कि किती हाल होतात आणि त्यातल्यात्यात एका धोकादायक वास्तविक जगात आपण एकटे असतो हि नुसती कल्पनाच किती भीतीदायक आहे. त्यामुळे ऑलिव्हर बद्दल वाचताना मी खूप संवेदनशील आणि हळवी झाले होते. मी किती सुखासीन आणि सुरक्षित आयुष्य जगत होते याचं मला भान आलं. माझ्या कोवळ्या मनाला अतिशय छेदून काढणारा तो क्षण होता.
त्याच दरम्यान व्हिक्टर ह्युगो लिखित आणि साने गुरुजी अनुवादित 'ल मिझराब' हि कादंबरी 'दुःखी' ह्या नावाने मराठीत मी वाचली. लहान असताना आपले भावविश्व किती स्तिमित असते. हि कादंबरी १८६२ मध्ये प्रकाशित झाली होती. साने गुरुजी यांनी लहान मुलांना ती वाचावयास मिळावी या हेतू करवे त्यात थोडेफार बदल केले. वालजी आणि त्याची जगण्याची लढाई तेव्हा मनावर निश्चितच एक खोल ओरखडा पाडून गेली. मला तेव्हा ते दुःख इतकं नकोसं झालं होतं कि काही महिन्यानंतर मी ते पुस्तक एका मैत्रिणीला देऊन टाकलं. आज मला वाटतंय मी ते माझ्याजवळ ठेवायला हवा होतं. पण लहान असताना आपण एवढ्या तीव्रतेने दुःखाचा सामना नाही करू शकत.
लहानपणी दिवाळीत वाचलेले अगणित 'किशोर'चे अंक, चांदोबा, टिंकल, चिल्ड्रेन'स डायजेस्ट, फास्टर फेणे, एनिड ब्लायटन लिखित दि फेमस फाईव्ह या साहस कथा, शेक्स्पीअरची मराठीत वाचलेली नाटके, प्रवास वर्णने, होमरची उत्कंठावर्धक सफर, सिलास मार्नरचा जीवन विषयक तेव्हा समजलेला दृष्टिकोन, मानवी भावसंबंधनांची गुंतागुंत, न पाहिलेल्या बाहेरच्या मोठया जगाबद्दलचे अनामिक आकर्षण या सगळ्या गोष्टी तेव्हा मला इतकी ऊर्जा देऊन गेले सातत्याने नवीन प्रेरक जगण्याबद्दल. मला अजूनही आठवतं, मी आणि डॅडी रविवारी पूर्ण दुपार वर्तमानपत्राच्या पुरवणीत पुस्तक परीक्षणे वाचायचो आणि ती पुस्तके वाचून त्यावर मी माझ्या मैत्रिणींसोबत चर्चा करायचे. एकमेकांना नवीन काहीतरी सांगताना किती अदभूत आनंदाची अनुभूती व्हायची तेव्हा.
माझे डॅडी नॅशनल बुक ट्रस्ट या लहान मुलांसाठी पुस्तके प्रकाशित करणाऱ्या संस्थेचे आजन्म सदस्य आहेत. त्यांच्या वाचन वेडामुळेच मला वाचनात इतकी गती आणि गोडी आली. त्यांनी कित्येक वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं माझ्यासाठी तेव्हा घरी आणली. मला ते स्वतः पुस्तक प्रदर्शनांमध्ये घेऊन जायचे, मी म्हणेन तितकी पुस्तकं त्यांनी विकत घेतली. आम्ही दोघं बऱ्याच रविवारी एकत्र पुस्तके वाचायचो. त्यावर चर्चा देखील करायचो. जशी भारतीय इतिहासाबद्दल मला ओढ वाटू लागली, त्यांनी वैश्विक साहित्य आणि संदर्भ ग्रंथ मला आणून दिले. नुसतं इतिहासाचं नाही तर प्रादेशिक भारतीय भाषांमधली ग्रंथसंपदा त्यांनी जमवली. माझ्या वडिलांमुळेच मला पुस्तकप्रेमाचा समृद्ध वारसा लाभला आणि मी तो जपायला आणिक अधिक इतरांमध्ये रुजवायला देखील शिकले.
आज बालदिनी मला परत एकदा लहान होऊन त्या स्मृती आठवायच्या आहेत, त्यांच्या मध्ये रमायचं आहे. शेवटी आपण कितीही वयाने मोठे झालो तरी आपल्या मनातले लहान मुल हे आपण जपलेलेच असते.
Comments
Post a Comment