आपण किती भूमिकांमधून वावरतो. आपल्या स्वतःच्या दृष्टिकोनांमधून कितीतरी वेगळ्या जाणिवा देखील आपण अनुभवतो. मग गरज पडल्यावर सगळ्यांनाच एका चपखल नजरेतून का बघतो? फार पूर्वी घडलेल्या एखाद्या घटनेची चाचपणी वर्तमानकाळात करताना किती संदर्भ बदलेले असतात. आणि आपण त्यात पुरते गोंधळून जातो. उगाच किती तडजोड करावी एखाद्याने? मन हे दरवेळी झालेल्या घटनांचं स्पष्टीकरण देण्यात किती मग्न होऊन जातं. नवीन लोक, त्यांचे नवीन विचार, त्यांच्याशी जुळवून घेण्यात एखाद्याला येणाऱ्या अडचणी- अगणित गोष्टी. प्रत्येकाची सुरुवात एका बिंदूपासून. शून्यातून. क्वचित आपण अशा निरनिराळ्या स्वभाववैशिष्ठांच्या प्रेमातही पडतो. असूया निर्माण होते. सतत आभासी संवाद कानात पिंगा घालायला लागतात. मध्य असा आनंद मग आपल्याला निर्माण करावा लागतो, सगळ्यांच्या सुखासाठी.
खरंच सुख म्हणजे नक्की काय असतं? दडपशाहीच्या वातावरणात जगताना सुद्धा लोक आनंद साजरा करतात, दुःखात आसवं गाळतात. मग आपण असा समज का निर्माण करून घ्यावा कि भौतिक सुखाची व्याख्या हि सगळ्यांसाठी सारखीच आहे? गतवैभवाच्या अनंत स्मृतींमध्ये आपण अडकून पडलेलो आहोत आणि विशेष म्हणजे येणारा प्रत्येक क्षण हा नवीन निरलस स्मृती होणार हे माहित असून देखील आपण भूतकाळात वावरत राहतो. फार आडपडदा ठेवतो आपण स्वतःशीच. कधीतरी मिश्किल गमतीजमतीत मन रमवावे. कधी दुःखावेश देखील सोसावा आणि त्यातून उभारून नवी स्फूर्ती जगाला द्यावी. आपल्यासारखे असंख्य तरुण निराशेच्या गर्तेत किंवा आनंदाच्या डोहात समवेळी झुलत असतील. त्या क्षणाला पार करून नवे चैतन्य आपल्यालाच निर्माण करायचे आहे.
मी आणि माझ्या सभोवताली असणाऱ्या असंख्य चांगले आचरण करणाऱ्या व्यक्तींच्या सहवासातून खूपशा गोष्टी मला शिकायला मिळाल्या आहेत आणि त्याबद्दल त्यांची मी ऋणीच आहे. आपल्यातलं चांगलं दुसऱ्यांना देणं यासाठी देखील मोठे मन असावे लागते. कारण मोठेपणा उपजतच कोणाकडे अंगात नसतो. येणाऱ्या अनुभवांमधून आपण तो शिकत असतो. जसजसे आपण सुधारणावादी विचारसरणी अंगिकारितो, आपले विचार त्या भूमिकांपल्याड आपल्यात दिसू लागतात. केवळ ताठ बाणा किंवा भाषा रांगडी असून चालत नाही, तर ती सर्वसमावेशक असणे गरजेचे ठरते तसेच उदारमतवादी होणे हि काही एखाद्या अभ्यासक्रमात शिकावयाची व्याख्या राहिलेली नाही. जग बदललंय आणि आपण त्या बदलाचे नुसते स्वागत नाही तर आता त्या बदलाचे अग्रेसर सहभागी होऊन हा मध्य मोडून एक नवी वाट चालायला हवी. कारण म्हणतात ना, बदल हाच निसर्गाचा नियम आहे.
Comments
Post a Comment