आपण आपला आनंद दुसऱ्यांमध्ये का म्हणून आणि किती दिवस शोधत राहायचा?
सगळं माहिती असतं डोक्याला, मनाला, बुद्धीला तरी सुद्धा आपण उगाच भावनांच्या खेळात अडकतो.
मी इतके दिवस तुझ्याशी नीट वागले, तुझं सगळं म्हणणं ऐकून घेतलं म्हणून तू सुद्धा माझ्यासोबत नीट वागलास. आता तुझ्या मनाप्रमाणे हव्या तशा गोष्टी घडत नाही म्हणून तू रुसवे- फुगवे करायला लागला आहेस!
तिच्याशी मी तुझ्यासाठी बोलत नाही हा तुझा आरोप. इतक्या नानाविध पद्धतीने तुला समजावण्याचा प्रयत्न केला मी गेली दोन-अडीच वर्षे, पण सर्व उथळ पाण्यात वाहून गेलं.
आता तिच्याशी मी बोलायला तयार नाही आणि ती तुझ्याशी, तर तू माझ्यासोबत बोलणं टाकलंस. ठीक आहे. तुझ्या येण्याआधी सुद्धा मी जगत होते आणि खूप चांगल्या पद्धतीने, उत्तम आरोग्यात होते. तुझ्या नसण्याने माझ्या आयुष्यात थोडे दिवस एखादी पोकळी निर्माण होईल पण ती भरून देखील जाईल. मी उगाच तुझ्या जाण्याने कोलमडून जाईन असं तुला वाटत असेल तर अजिबात नाही. एवढा अधिकार नाही दिला मी तुला माझ्या आयुष्यात, किंबहुना तो कुणालाच नाही आणि कधी देणार सुद्धा नाही.
खूप रडले मी तुझ्यासोबत असताना आणि आता तर मला फक्त त्या दुःखी , रडक्या दिवसांची स्मृती आहे. माझा निखळ आनंद, माझी हसरी मुद्रा माझ्याच मनातून लोप पावली आहे, फक्त काही छायाचित्रांमधून त्या आठवणी आहेत. खरंच मी फार वाहवत गेले होते तुझं दुःख समजून घेताना, तुला आधार देताना. इतकी कि कधी तुझं दुःख माझं झालं याचा मला पत्ता देखील लागला नाही. उगाच मोठेपण कवटाळलं तुझ्यासाठी.
पण, आता तो काळ सरलाय आणि मी परत माझ्या जगात आले आहे.
या पुढे माझं आयुष्य माझ्यासाठी जगणार मी.
आज २७ फेब्रुवारी. कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आणि मराठी भाषा दिवस. त्यानिमित्त मला आवडणाऱ्या एका मराठी लेखिकेच्या पुस्तकाचं विवेचन इथे करते. गौरी देशपांडे- मराठी वाचणाऱ्या साऱ्याच वाचकांना हे नाव जितकं परिचित आहे तितकच फार जवळचं देखील आहे. मी सर्वप्रथम गौरी देशपांडे यांची एक कथा शाळेत असताना अभ्यासली होती- कलिंगड. आणि कित्येक दिवस मी त्या कथेच्या पुढे अजून काही असेल का म्हणून उत्सुक आणि अस्वस्थ होते. दहावीत असताना वाचली होती म्हणून त्यांचं सर्व लिखाण वाचून काढायचं हे ठरवलं. पुढची चार- पाच वर्ष त्यांचं असं काही वाचनात आलं नाही. नंतर 'आर्किटेक्चर' शिकताना कॉलेजच्या ग्रंथालयात मराठी पुस्तकांचं कपाट दिसलं. आणि पाहिलं पुस्तक जे मी घेतलं नी वाचलं ते गौरी देशपांडेंचं 'मुंबई-तळेगाव-ग्रीस' असा प्रवास करणारी 'मुक्काम' हि दीर्घ कथा/कादंबरी. त्याचं दुसरं पुस्तक वाचलं ते म्हणजे 'आहे हे असे आहे', आणि त्यात मला परत एकदा सापडली ती 'कलिंगड' हि कथा. मी चार-पाच वेळा ते पुस्तक वाचून काढलं परीक्षा सुरु होण्याच्या काही दिवस आधी, एप्रिल मधेच आणि त्या कलिंगड...
Comments
Post a Comment