आज मी मोकळा श्वास घेतला. इतके दिवस जे दडपण होतं, ते निवळलं. मनात दुःखाची एक रुंद दरी निर्माण झाली होती ती आज बुजली. किती किती त्रास करून घेतला मी स्वतःला, उगाच मनाला निरर्थक क्लेश दिला. बोलणं महत्वाचं, कुठल्याही आणि सगळ्या परिस्थितीत.
आपल्या अवतीभवती इतकी माणसं सतत रुंजी घालत असतात, त्यांचे विचार, त्यांचं वागणं आपण स्वतःवर घेतो. त्यानुसार आपण आपल्या भावनांना मोकळीक देतो आणि क्वचित अवचित घोळत बसतो आतल्या आत. आज, खऱ्या अर्थाने माझं मन शांत आहे. फक्त हळुवार फुंकर हवी होती मायेची, जी मी स्वतःला देत नव्हते. इतकं इतरांना देण्यामागे आपण लागतो कि, स्वतःला स्वतःकडून खूप काही हवं असतं हेच विसरतो! पण हा सगळा विचारांचा गुंता आज मी सोडवला आहे. आणि, याला आता परत थारा नाही.
किती सुंदर दिवस आहेत, फुलण्याचे! उगाच कोमेजून कळीतच अस्तित्व मिटवत होते. बहर असून सुद्धा ढगांना बघून विजेला घाबरत होते. हसण्याचे इतके क्षण आहेत, आणि मी दुःखाला कुरवाळत बसले. आता मोकळा श्वास आणि स्वतःच्या पंखाना थोडं अजून बळ देण्याकरिता घेतलेली ही उंच भरारी!
Comments
Post a Comment