हळूहळू मनावरचा ताण सैल झाला. उन्हात बसले, हसले, काही जुन्या गोष्टी आठवल्या. क्षणात सकाळपासून दाटून आलेलं मळभ दूर झालं. आधी छातीत धडधडलं, हात थरथरले, मग काहीतरी माझ्या आत निवळलं. आपल्या मनाला सतत एखाद्या टॉनिकची गरज असते. ते टॉनिक मी बऱ्याच दिवसांत प्यायले नव्हते म्हणून हा सगळा उहापोह. शब्दांमध्ये काय विलक्षण सामर्थ्य असतं! माझ्या मनाला उभारी देणारे, त्याला मोकळं करणाऱ्या मैत्रिणी भेटल्या. क्षणात किती बदल झाले. माझ्या खांद्यांवर एक अनामिक ओझं मी वाहत होते, ते हलकं होत गेलं. आपला आनंद, मनःशांती आपण स्वतः शोधावी लागते. विनाकारण विचारांचं ओझं आपण घेऊन फिरत राहतो.
ऊन जसजसं वाढत गेलं, तसे मनातले दुःख वितळत गेले. आपल्या अवतीभवती किती सुंदर जग आहे. आपण सगळं विसरून केवळ स्वतः मध्ये रममाण होत जातो आणि मग त्या सातत्याचा देखील कंटाळा येत राहतो. नवीन काहीतरी करण्याची उर्मी विरून जाते. जसा आनंद शोधता यायला हवा, तशीच स्वयं- प्रेरणा देखील आपण जागृत करायला हवी. फार गुरफुटून गेलोय आपण एकाच ध्यासाच्या मागे. सगळे करतात, पूर्ण जग तसंच चाललंय म्हणून त्यांच्यासारखे होण्याचा आणि करण्याचा अट्टहास आता आपण टाकून द्यायला हवा.
निसर्गातल्या सर्व अभूतपूर्व गोष्टींचा आस्वाद घ्यायला आता सुरुवात करणं जरूरी आहे. आपल्यातल्या कोवळेपणा जपणं महत्वाचं आहे. मला कित्येक दिवस सतत असं वाटत राहिलं कि मी स्वतःला हरवून बसलेय. नवीन गोष्टी, नवीन वातावरणात एरवी रुळते त्यापेक्षा लवकर रुळले आणि मग त्या झटपट सरावण्यामुळे, स्वतःला वेळचं दिला नाही मी. एरवी माझा वेळ घेऊन त्या प्रक्रियेतून स्वतःला मी घडवते, तो मी इथे केलाच नाही. म्हणून सतत स्वतःला रोज शोधात राहिले. काहीतरी अपूर्ण आहे, काहीतरी बिनसलंय म्हणून आतल्याआत धुसफुसत राहिले. माझ्या मनातला कुठला तरी रिकामा कप्पा सतत एक ओलावा, एक मायेची तिरीप यासाठी आसुसत राहिला.
आज अनपेक्षितपणे त्या सगळ्याला मोकळी वाट मिळाली आणि मी मुक्तता अनुभवली. हृदयात काहीतरी अडखळलं होतं, ते निवळलं. किती शांतता पसरलीय माझ्या मनभर! ही अनुभूती यायला, एवढा सगळा घोळ घातला माझ्या मनाने. अजूनही कुठली तरी अस्पष्ट, अव्यक्त ओझं आहेच, पण ते आता इतकं महत्वाचं उरलं नाही. विचार करता करता आणि इथे लिहिताना, कित्येक क्षण स्मरले आणि विरले देखील. खरं म्हणजे, व्यक्त होणे रेंगाळत होते आणि म्हणूनच दडपणाचे ढग माझ्यावर राज्य करत होते. फुलण्यातला मोकळा श्वास मी घेतला आहे आणि म्हणूनच विझण्यातला आणि बुजण्यातला दुखरा प्रवास मला इतका कष्टी बनवत गेला.
आता स्वस्थता आहे, निर्विकार शांतता आत पसरली आहे. डोळे मिटल्यावर एका शांत क्षितिजाचा पटल दिसतोय. तीच माझी स्थिरता! आजचा दिवस एक नवीन उमेद घेऊन मी यापुढे स्वतःला सावरेन. निराशा हा जीवनाचा भाग आहे. त्याला तेवढ्यापुरते आयुष्याचा एक घटक मानून पुढे आशावाद टिकवण्याचा प्रयत्न करेन. माझ्या कितीतरी आकांक्षा आहेत, त्यांना जगण्याचं आणि उडण्याचं बळ देईन. स्वनिर्मितीचा आनंद घेत राहीन. हे जीवन सुंदर आहे! नुसते गाण्यात नाही तर प्रत्यक्षात जगेन!
Comments
Post a Comment