Skip to main content

तर्काच्या खुंटीवरून निसटलेलं हास्य

केवळ काहीतरी रोज लिहायचं म्हणून लिहिणारे असे कितीक असतील आणि मनातलं कागदावर ओथंबून देण्यासाठी लिहिणारे किती असतील? नुसती उगाच आकडेमोड नकोच. हल्ली लोकांना फार लवकर राग येतो आणि तो लवकर व्यक्त सुद्धा होतो. तर्कावरून सुरु झालेला प्रवास तर्कशुद्ध विवेचनावरच थांबतो असं तर अजिबातच होत नाही. काल एका मराठी वृत्त वाहिनीवर हैदराबाद मध्ये कन्हैया कुमार वर चप्पल फेकली गेली त्यावर चर्चासत्र बघितलं. इतके खुजे लोक राजकारणात आहेत आणि असं विषारी राजकारण करतात हे बघून वाईट तर वाटलच पण आपल्या देशाच्या गौरवशाली परंपरेबद्दल ह्या लोकांच्या मनात किती भ्रामक समजुती आहेत, याचादेखील प्रत्यय आला. 

मुळातच विद्यार्थी चळवळ हि काही आज किंवा काल सुरु झालेली चळवळ नाही. तिला देखील काही इतिहास आहेच. आजच्या राजकारणात मुरलेली मंडळी जेव्हा इतका विखारी विद्यार्थी द्वेष व्यक्त करतात तेव्हा आश्चर्यापेक्षा त्यांची मला कीवच जास्त येते. एका विद्यार्थ्याने तुम्हाला एवढं जेरीस आणलं आहे कि त्याच्यावर तुम्ही आता चप्पल देखील फेकतात, त्याला जीवे मारायची धमकी देतात, हात पाय तोडणे यासारख्या फुटकळ घोषणा करतात आणि त्याला तुमचे तितकेच महामूर्ख कार्यकर्ते आदेश समजून तत्काळ त्या अमलात देखील आणतात यापेक्षा हास्यास्पद राजकारण आजपर्यंत या देशाने तरी पाहिलेले नाही. 

महाराष्ट्रात आणि पुण्यात, ते देखील फर्ग्यूसन सारख्या महाविद्यालयात देखील काल जो प्रकार झाला तो निंदनियच. स्वतःचं हसं करून घ्यायची जर एवढी खुमखुमी सत्तेत असलेल्या पक्षाला आहे तर ती त्यांनी खुशाल मोकाटपणे करावी, पण विद्यार्थ्यांच्या मानगुटीवर बसून नाही. आजचा विद्यार्थी हा उद्याचा सुजाण नागरिक आहे आणि जर त्याला तुम्ही तुमच्या दबावतंत्राने मारून-मुटकून अशी शिस्त लावायचा प्रयत्न करत असाल, तर तो सोडून द्या. आता तो काळ सरला जेव्हा एखाद्या नेत्याला शिरसावंद्य मानून त्याच्या प्रत्येक शब्दाला नागरिक अलगद आपल्या मनाच्या हिंदोळ्यावर झुलवायचे. आता 'स्मार्ट' पिढी तयार झाली आहे. आम्हाला डोळे, कान आणि आमची स्वतःची शाबूत अशी विचारशक्ती आहे. तुमचं राजकारण कळण्याइतपत बुद्धी तर नक्कीच आहे. किती रोहित, कन्हैय्या आणि उदय यांना तुम्ही रोखाल? अजून किती काळ? आमचं राष्ट्रप्रेम फक्त पाठ्यपुस्तकातल्या स्वातंत्र्य चळवळीपुरता मर्यादित नाही किंवा सीमेवर देशासाठी शहीद होणाऱ्या सैनिक बांधवांपुरता देखील मर्यादित नाही. दिखाऊपणा करणाऱ्या कुठल्याही दांभिक विचारधारेचा आम्ही अट्टहास धरत नाही. धर्माच्या, जातीयतेच्या, लिंगभेदाच्या भिंती ओलांडून आमच्या प्रेरक विचारसरणीचा जन्म झालेला आहे. त्यामुळे अजून किती काळ या देशातले नेते आणि स्वयंघोषित विद्यार्थ्यांची माता आम्हाला लहान मानून आमचे विचार खोडून टाकायचा प्रयत्न करणार आहेत? असाल तर सोडून द्या. तुम्हाला आता यापुढे नवीन आव्हानं आमच्या रूपातच बघायला मिळतील. 

Comments

Popular posts from this blog

या जन्मावर, या जगण्यावर...शतदा प्रेम करावे?

पुस्तकांच्या आणि निसर्गाच्या साथीत जेवढा वेळ छान जातो आणि सार्थकी लागल्यासारखा वाटतो तितका खचितच कुठेतरी अन्यत्र वाटतो. नवीन वर्षात केलेल्या संकल्पांपैकी एक म्हणजे वाचलेल्या प्रत्येक पुस्तकावर स्वतःचं विवेचन लिहिणं. सुरुवात तर झाली आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आणि वर्ष अखेरीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या बऱ्याच बुक स्टोर्सनी भर भक्कम डिसकाउंट जाहीर केला होता. मी देखील नाही नाही म्हणता लोभाला भुलून पार ATM मध्ये जाऊन पैसे काढून पुस्तकं खरेदी केलीत वर्षाच्या शेवटच्या दिवशी. टिव्ही वरच्या असंख्य कार्यक्रमांवर नजर फिरवल्यास असं चित्र दिसतं कि समाजाच्या नैतिक मूल्यांशी कार्यक्रम बनवणाऱ्यांच काहीच घेणं-देणं दिसत नाही. माणसांची पतच एवढी रसातळाला गेली आहे कि कपोलकल्पित आणि वास्तव जग यांची चांगलीच सरमिसळ आपण करून ठेवली आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचे आपले काहीच मनसुबे वाटत नाही. आज सकाळी विचार करता करता माझ्या असं लक्षात आलं कि आपण किती उगाच खलबतं करतो, आपला दुरान्वये संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल. काल रात्री जेवताना मी कुमार केतकरांचं "बदलते विश्व" हे साधारण दहा वर्षांपूर्व...

गौरी देशपांडे आणि मी

आज २७ फेब्रुवारी. कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आणि मराठी भाषा दिवस. त्यानिमित्त मला आवडणाऱ्या एका मराठी लेखिकेच्या पुस्तकाचं विवेचन इथे करते. गौरी देशपांडे- मराठी वाचणाऱ्या साऱ्याच वाचकांना हे नाव जितकं परिचित आहे तितकच फार जवळचं देखील आहे. मी सर्वप्रथम गौरी देशपांडे यांची एक कथा शाळेत असताना अभ्यासली होती- कलिंगड. आणि कित्येक दिवस मी त्या कथेच्या पुढे अजून काही असेल का म्हणून उत्सुक आणि अस्वस्थ होते. दहावीत असताना वाचली होती म्हणून त्यांचं सर्व लिखाण वाचून काढायचं हे ठरवलं. पुढची चार- पाच वर्ष त्यांचं असं काही वाचनात आलं नाही. नंतर 'आर्किटेक्चर' शिकताना कॉलेजच्या ग्रंथालयात मराठी पुस्तकांचं कपाट दिसलं. आणि पाहिलं पुस्तक जे मी घेतलं नी वाचलं ते गौरी देशपांडेंचं 'मुंबई-तळेगाव-ग्रीस' असा प्रवास करणारी 'मुक्काम' हि दीर्घ कथा/कादंबरी. त्याचं दुसरं पुस्तक वाचलं ते म्हणजे 'आहे हे असे आहे', आणि त्यात मला परत एकदा सापडली ती 'कलिंगड' हि कथा. मी चार-पाच वेळा ते पुस्तक वाचून काढलं परीक्षा सुरु होण्याच्या काही दिवस आधी, एप्रिल मधेच आणि त्या कलिंगड...

वेंधळेपणा

काही लोकांना वेंधळेपणा करण्याची एवढी सवय जडली असते कि कितीही त्यांनी काळजीने काम करण्याचा प्रयत्नापुर्वक निश्चय केला तरीही तो कधी तडीस जात नाही. मला माहित असलेल्या काही वेंधळ्या माणसांबद्दल सांगायचं झालं तर त्याचं प्रत्येक काम किंवा कृती हि इतरांसाठी तापदायकच ठरते बहुतेक वेळा. म्हणजे विद्यार्थ्यांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर त्यांना परीक्षेत अभ्यास आठवेल का याचं टेन्शन असतं पण तरीही त्यातल्यात्यात त्यांच्या वेंधळेपणात कुठेही कसूर रहात नाही. अगदी परीक्षेची सामग्री नीट घेण्यापासून ते ओळखपत्र, परीक्षेत व्यवस्थित पेपर लिहिण्यापर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये यांचा धांदरटपणा दिसून येतो. अशा लोकांच्या बेजबाबदार वागण्याची किंमत त्यांच्या परीजनांना भोगावी लागते याचं त्यांना सोयरसुतक देखील नाही. शेवटी काय तर माणूस स्वतःच्या स्वार्थाचाच विचार करतो. मला तर अतिशय राग आहे अशा लोकांच्या आप्पल्पोटेपणाची. त्यांच्या जगाचे ते राजे, सगळं भूमंडल फक्त यांच्या अवतीभवतीच फिरत असल्याचा यांचा फाजील गोड गैरसमज. आपल्यामुळे समोरच्याला केवढा मानसिक त्रास सोसावा लागत असेल याचा थांगपत्तासुद्धा अशा लोकांना नसतो मु...