Skip to main content

या जन्मावर, या जगण्यावर...शतदा प्रेम करावे?

पुस्तकांच्या आणि निसर्गाच्या साथीत जेवढा वेळ छान जातो आणि सार्थकी लागल्यासारखा वाटतो तितका खचितच कुठेतरी अन्यत्र वाटतो. नवीन वर्षात केलेल्या संकल्पांपैकी एक म्हणजे वाचलेल्या प्रत्येक पुस्तकावर स्वतःचं विवेचन लिहिणं. सुरुवात तर झाली आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आणि वर्ष अखेरीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या बऱ्याच बुक स्टोर्सनी भर भक्कम डिसकाउंट जाहीर केला होता. मी देखील नाही नाही म्हणता लोभाला भुलून पार ATM मध्ये जाऊन पैसे काढून पुस्तकं खरेदी केलीत वर्षाच्या शेवटच्या दिवशी.

टिव्ही वरच्या असंख्य कार्यक्रमांवर नजर फिरवल्यास असं चित्र दिसतं कि समाजाच्या नैतिक मूल्यांशी कार्यक्रम बनवणाऱ्यांच काहीच घेणं-देणं दिसत नाही. माणसांची पतच एवढी रसातळाला गेली आहे कि कपोलकल्पित आणि वास्तव जग यांची चांगलीच सरमिसळ आपण करून ठेवली आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचे आपले काहीच मनसुबे वाटत नाही. आज सकाळी विचार करता करता माझ्या असं लक्षात आलं कि आपण किती उगाच खलबतं करतो, आपला दुरान्वये संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल. काल रात्री जेवताना मी कुमार केतकरांचं "बदलते विश्व" हे साधारण दहा वर्षांपूर्वी प्रकाशित झालेलं पुस्तक वाचत होते. वाचता वाचता सहज मनात आलं कि, तेव्हा आणि आज रूढ अर्थाने काहीच बदल जगात झालेला नाहीये. आपण जगाचा एवढा विचार का करतो? आपले हितसंबंध जुळले आहेत म्हणून? आपल्या जगण्याचा आणि जागतिक पातळीवर होणाऱ्या घडामोडींचा इतका विचारविमर्श आपण का करावा? मला उगाच फार सिनिकल वाटतंय. गौरी म्हणते त्याप्रमाणे, 'इतर' लोकांना माझ्यापेक्षा जास्त माहिती असावं. आयुष्यात तर्हतर्हेच्या गोष्टींची गिचडी गल्लत करायची मला सवयच आहे. दोन निरनिराळ्या गोष्टी दोन कप्प्यांत नाही का ठेवता येत?

डोक्याला फार ताण दिल्यावर मला असंही जाणवतं कि माझ्या जगाबद्दल, लोकांबद्दल, अगदी स्वतःबद्दल देखील काही किती बाळबोध संकल्पना आहेत. किंबहुना जसा मी पंधरा वर्षांची असताना विचार करायचे या सगळ्यांबद्दल, आजही माझं मत काही विशेष बदललेलं नाहीये. लहानपणी मी सातवीत असताना माझ्या पहिलीत असणाऱ्या लहान बहिणीला शाळेत पोहोचवायला आणि घ्यायला जायचे. बऱ्याचदा घरी परतताना ती तिचं अवजड दप्तर मला द्यायची. त्या दप्तराचं कोण जाणो मला प्रचंड ओझं वाटायचं. मी खूप वेळा ते घ्यायचीच नाही. माझ्या इटुकल्याशा लहान बहिणीचा रडवेला चेहरा आजही माझ्या डोळ्यांसमोर तरळतोय. ते एवढंसं दप्तर मी का घेतलं नाही, याची मला राहून राहून लाज आणि खंत वाटते आज. काही आठवणी मनावर आणि हृदयावर ओरखडे सोडून जातात. त्यातलीच हि एक मला प्रकर्षाने सतत छळणारी आठवण. तिला त्याबद्दल काय वाटतं हे मला माहीत नाही पण कधीतरी माझं गिल्ट मी तिच्या समोर मांडू शकेन अशी आशा करते. माणसामाणसांमधल्या इतक्या कैक वेदना आणि भावना निशब्ध, अव्यक्त राहतात कि वेळ हि एक केवळ संज्ञा म्हणून शेवटी नावारूपास उरते. आपल्या भावविश्वाचा आपण इतका कोंडमारा करून ठेवलाय समाजाच्या चौकटीत राहण्याच्या हट्टापायी कि आपण स्वतःला हरवून बसलोय याची पुसटशी कल्पना देखील आपल्याला नाही. जीवनाचा प्रत्येक टप्पा आखून ठेवलेल्या स्थितीत आपल्याला आई-वडील आणि समाज यांच्याकडून मिळतो आणि आपण तसेच प्रत्येक टप्पा कधी अडखळत कधी नाराजीत पार करत राहतो. थोडा आपला सूर वेगळा झाला कि त्याचे परिणाम आपल्याला रंगवून दिले जातात. उमेद, जिगीर, अवलिया हे फक्त शब्द म्हणून उरून राहतात आयुष्यात. खरे आपण कोण हे कधीच आपल्याला कळत नाही, किंबहुना ते गवसण्याची संधीच आपण स्वतःला देत नाही. "वेळ" हे परिमाण बनून आपले पूर्ण आयुष्य हाताळत राहते. आपण स्वतःसाठी जगतो असे म्हणत राहतो पण प्रत्यक्षात जगासाठी आपले जगणे दाखवत राहतो. तरी देखील स्वतःची समजूत काढतो आणि या जन्मावर, या जगण्यावर...शतदा प्रेम करावे  या ओळी हसत गात कुढत निघून जातो. 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गौरी देशपांडे आणि मी

आज २७ फेब्रुवारी. कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आणि मराठी भाषा दिवस. त्यानिमित्त मला आवडणाऱ्या एका मराठी लेखिकेच्या पुस्तकाचं विवेचन इथे करते. गौरी देशपांडे- मराठी वाचणाऱ्या साऱ्याच वाचकांना हे नाव जितकं परिचित आहे तितकच फार जवळचं देखील आहे. मी सर्वप्रथम गौरी देशपांडे यांची एक कथा शाळेत असताना अभ्यासली होती- कलिंगड. आणि कित्येक दिवस मी त्या कथेच्या पुढे अजून काही असेल का म्हणून उत्सुक आणि अस्वस्थ होते. दहावीत असताना वाचली होती म्हणून त्यांचं सर्व लिखाण वाचून काढायचं हे ठरवलं. पुढची चार- पाच वर्ष त्यांचं असं काही वाचनात आलं नाही. नंतर 'आर्किटेक्चर' शिकताना कॉलेजच्या ग्रंथालयात मराठी पुस्तकांचं कपाट दिसलं. आणि पाहिलं पुस्तक जे मी घेतलं नी वाचलं ते गौरी देशपांडेंचं 'मुंबई-तळेगाव-ग्रीस' असा प्रवास करणारी 'मुक्काम' हि दीर्घ कथा/कादंबरी. त्याचं दुसरं पुस्तक वाचलं ते म्हणजे 'आहे हे असे आहे', आणि त्यात मला परत एकदा सापडली ती 'कलिंगड' हि कथा. मी चार-पाच वेळा ते पुस्तक वाचून काढलं परीक्षा सुरु होण्याच्या काही दिवस आधी, एप्रिल मधेच आणि त्या कलिंगड...

वेंधळेपणा

काही लोकांना वेंधळेपणा करण्याची एवढी सवय जडली असते कि कितीही त्यांनी काळजीने काम करण्याचा प्रयत्नापुर्वक निश्चय केला तरीही तो कधी तडीस जात नाही. मला माहित असलेल्या काही वेंधळ्या माणसांबद्दल सांगायचं झालं तर त्याचं प्रत्येक काम किंवा कृती हि इतरांसाठी तापदायकच ठरते बहुतेक वेळा. म्हणजे विद्यार्थ्यांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर त्यांना परीक्षेत अभ्यास आठवेल का याचं टेन्शन असतं पण तरीही त्यातल्यात्यात त्यांच्या वेंधळेपणात कुठेही कसूर रहात नाही. अगदी परीक्षेची सामग्री नीट घेण्यापासून ते ओळखपत्र, परीक्षेत व्यवस्थित पेपर लिहिण्यापर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये यांचा धांदरटपणा दिसून येतो. अशा लोकांच्या बेजबाबदार वागण्याची किंमत त्यांच्या परीजनांना भोगावी लागते याचं त्यांना सोयरसुतक देखील नाही. शेवटी काय तर माणूस स्वतःच्या स्वार्थाचाच विचार करतो. मला तर अतिशय राग आहे अशा लोकांच्या आप्पल्पोटेपणाची. त्यांच्या जगाचे ते राजे, सगळं भूमंडल फक्त यांच्या अवतीभवतीच फिरत असल्याचा यांचा फाजील गोड गैरसमज. आपल्यामुळे समोरच्याला केवढा मानसिक त्रास सोसावा लागत असेल याचा थांगपत्तासुद्धा अशा लोकांना नसतो मु...