Skip to main content

बुकस्तके!!

काही व्यक्तिरेखा चिरतरुण असतात आणि त्या सदैव जिवंत राहतात. माझ्या मनात चिरंतर घर करून राहिलेल्या काहींविषयी मी आज इथे लिहिणार आहे. साधारण अकरा वर्षांची असताना मी पहिल्यांदा चार्ल्स डिकन्स लिखित 'ऑलिव्हर ट्विस्ट' हि कादंबरी वाचली. माझ्याच वयाच्या असणाऱ्या एका अनाथ मुलाची ती कथा वाचताना नुसतेच माझे डोळे भरून आले नव्हते तर मी ढसाढसा रडले होते. त्याचे करुण डोळे मला सारखे माझ्या नजरेसमोर दिसायचे. जगात आपल्यासोबत आपली काळजी घेणारं कुणी नसलं कि किती हाल होतात आणि त्यातल्यात्यात एका धोकादायक वास्तविक जगात आपण एकटे असतो हि नुसती कल्पनाच किती भीतीदायक आहे. त्यामुळे ऑलिव्हर बद्दल वाचताना मी खूप संवेदनशील आणि हळवी झाले होते. मी किती सुखासीन आणि सुरक्षित आयुष्य जगत होते याचं मला भान आलं. माझ्या कोवळ्या मनाला अतिशय छेदून काढणारा तो क्षण होता.

त्याच दरम्यान व्हिक्टर ह्युगो लिखित आणि साने गुरुजी अनुवादित 'ल मिझराब' हि कादंबरी 'दुःखी' ह्या नावाने मराठीत मी वाचली. लहान असताना आपले भावविश्व किती स्तिमित असते. हि कादंबरी १८६२ मध्ये प्रकाशित झाली होती. साने गुरुजी यांनी लहान मुलांना ती वाचावयास मिळावी या हेतू करवे त्यात थोडेफार बदल केले. वालजी आणि त्याची जगण्याची लढाई तेव्हा मनावर निश्चितच एक खोल ओरखडा पाडून गेली. मला तेव्हा ते दुःख इतकं नकोसं झालं होतं कि काही महिन्यानंतर मी ते पुस्तक एका मैत्रिणीला देऊन टाकलं. आज मला वाटतंय मी ते माझ्याजवळ ठेवायला हवा होतं. पण लहान असताना आपण एवढ्या तीव्रतेने दुःखाचा सामना नाही करू शकत. 

लहानपणी दिवाळीत वाचलेले अगणित 'किशोर'चे अंक, चांदोबा, टिंकल, चिल्ड्रेन'स डायजेस्ट, फास्टर फेणे, एनिड ब्लायटन लिखित दि फेमस फाईव्ह या साहस कथा, शेक्स्पीअरची मराठीत वाचलेली नाटके, प्रवास वर्णने, होमरची उत्कंठावर्धक सफर, सिलास मार्नरचा जीवन विषयक तेव्हा समजलेला दृष्टिकोन, मानवी भावसंबंधनांची गुंतागुंत, न पाहिलेल्या बाहेरच्या मोठया जगाबद्दलचे अनामिक आकर्षण या सगळ्या गोष्टी तेव्हा मला इतकी ऊर्जा देऊन गेले सातत्याने नवीन प्रेरक जगण्याबद्दल. मला अजूनही आठवतं, मी आणि डॅडी रविवारी पूर्ण दुपार वर्तमानपत्राच्या पुरवणीत पुस्तक परीक्षणे वाचायचो आणि ती पुस्तके वाचून त्यावर मी माझ्या मैत्रिणींसोबत चर्चा करायचे. एकमेकांना नवीन काहीतरी सांगताना किती अदभूत आनंदाची अनुभूती व्हायची तेव्हा. 

माझे डॅडी नॅशनल बुक ट्रस्ट या लहान मुलांसाठी पुस्तके प्रकाशित करणाऱ्या संस्थेचे आजन्म सदस्य आहेत. त्यांच्या वाचन वेडामुळेच मला वाचनात इतकी गती आणि गोडी आली. त्यांनी कित्येक वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं माझ्यासाठी तेव्हा घरी आणली. मला ते स्वतः पुस्तक प्रदर्शनांमध्ये घेऊन जायचे, मी म्हणेन तितकी पुस्तकं त्यांनी विकत घेतली. आम्ही दोघं बऱ्याच रविवारी एकत्र पुस्तके वाचायचो. त्यावर चर्चा देखील करायचो. जशी भारतीय इतिहासाबद्दल मला ओढ वाटू लागली, त्यांनी वैश्विक साहित्य आणि संदर्भ ग्रंथ मला आणून दिले. नुसतं इतिहासाचं नाही तर प्रादेशिक भारतीय भाषांमधली ग्रंथसंपदा त्यांनी जमवली. माझ्या वडिलांमुळेच मला पुस्तकप्रेमाचा समृद्ध वारसा लाभला आणि मी तो जपायला आणिक अधिक इतरांमध्ये रुजवायला देखील शिकले. 

आज बालदिनी मला परत एकदा लहान होऊन त्या स्मृती आठवायच्या आहेत, त्यांच्या मध्ये रमायचं आहे. शेवटी आपण कितीही वयाने मोठे झालो तरी आपल्या मनातले लहान मुल हे आपण जपलेलेच असते.

Comments

Popular posts from this blog

या जन्मावर, या जगण्यावर...शतदा प्रेम करावे?

पुस्तकांच्या आणि निसर्गाच्या साथीत जेवढा वेळ छान जातो आणि सार्थकी लागल्यासारखा वाटतो तितका खचितच कुठेतरी अन्यत्र वाटतो. नवीन वर्षात केलेल्या संकल्पांपैकी एक म्हणजे वाचलेल्या प्रत्येक पुस्तकावर स्वतःचं विवेचन लिहिणं. सुरुवात तर झाली आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आणि वर्ष अखेरीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या बऱ्याच बुक स्टोर्सनी भर भक्कम डिसकाउंट जाहीर केला होता. मी देखील नाही नाही म्हणता लोभाला भुलून पार ATM मध्ये जाऊन पैसे काढून पुस्तकं खरेदी केलीत वर्षाच्या शेवटच्या दिवशी. टिव्ही वरच्या असंख्य कार्यक्रमांवर नजर फिरवल्यास असं चित्र दिसतं कि समाजाच्या नैतिक मूल्यांशी कार्यक्रम बनवणाऱ्यांच काहीच घेणं-देणं दिसत नाही. माणसांची पतच एवढी रसातळाला गेली आहे कि कपोलकल्पित आणि वास्तव जग यांची चांगलीच सरमिसळ आपण करून ठेवली आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचे आपले काहीच मनसुबे वाटत नाही. आज सकाळी विचार करता करता माझ्या असं लक्षात आलं कि आपण किती उगाच खलबतं करतो, आपला दुरान्वये संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल. काल रात्री जेवताना मी कुमार केतकरांचं "बदलते विश्व" हे साधारण दहा वर्षांपूर्व

गौरी देशपांडे आणि मी

आज २७ फेब्रुवारी. कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आणि मराठी भाषा दिवस. त्यानिमित्त मला आवडणाऱ्या एका मराठी लेखिकेच्या पुस्तकाचं विवेचन इथे करते. गौरी देशपांडे- मराठी वाचणाऱ्या साऱ्याच वाचकांना हे नाव जितकं परिचित आहे तितकच फार जवळचं देखील आहे. मी सर्वप्रथम गौरी देशपांडे यांची एक कथा शाळेत असताना अभ्यासली होती- कलिंगड. आणि कित्येक दिवस मी त्या कथेच्या पुढे अजून काही असेल का म्हणून उत्सुक आणि अस्वस्थ होते. दहावीत असताना वाचली होती म्हणून त्यांचं सर्व लिखाण वाचून काढायचं हे ठरवलं. पुढची चार- पाच वर्ष त्यांचं असं काही वाचनात आलं नाही. नंतर 'आर्किटेक्चर' शिकताना कॉलेजच्या ग्रंथालयात मराठी पुस्तकांचं कपाट दिसलं. आणि पाहिलं पुस्तक जे मी घेतलं नी वाचलं ते गौरी देशपांडेंचं 'मुंबई-तळेगाव-ग्रीस' असा प्रवास करणारी 'मुक्काम' हि दीर्घ कथा/कादंबरी. त्याचं दुसरं पुस्तक वाचलं ते म्हणजे 'आहे हे असे आहे', आणि त्यात मला परत एकदा सापडली ती 'कलिंगड' हि कथा. मी चार-पाच वेळा ते पुस्तक वाचून काढलं परीक्षा सुरु होण्याच्या काही दिवस आधी, एप्रिल मधेच आणि त्या कलिंगडाची

आठवणीतल्या पाऊस गोष्टी!

गेल्या आठवड्यापासून पाऊस सगळीकडे चांगलाच पडतोय आणि हळूहळू पावसावरचे लेख देखील वाचण्यात येऊ लागलेत. मला फार पूर्वीपासूनच पावसात भिजणं आवडत नाही. कॉलेजच्या दिवसांत देखील ट्रेनने प्रवास करताना अनेकवेळा चिंब भिजून त्या गर्दीत चढताना जीव नकोसा व्हायचा. मला सर्दी लवकर होते म्हणून देखील मी पावसात भिजणं कटाक्षाने टाळते. तर आज हा इथे लिहिण्याचा उहापोह यासाठी की एका मैत्रिणीने तिच्या पावसाळी दिवसांच्या भुट्टा खाणाऱ्या आठवणी लिहिल्यात आणि त्या वाचून मी देखील काही क्षण त्या सुंदर गतकाळात स्थिरावले.  एके दिवशी पावसात चिंब भिजून कॉलेजला पोहोचले तर तिथे आमचा स्टुडिओच गळत होता. सगळीकडे फरशीवर पाणी आणि त्या अंधारलेल्या जागेत आम्ही मिळेल त्या कोरड्या जागेत बसलेलो मला आजही लक्ख आठवतंय.  नंतरच्या आठवणी ह्या जेजेतल्या हिरव्या पटांगणावर पडणाऱ्या पाऊसधारा बघण्याच्या आणि नाचत उड्या मारत पावसाला चकवत स्टुडिओ ते कॅन्टीनला पळण्याच्या ह्या होत्या.  इंटर्नशिपच्या काळात व्हीटी ते कुलाबा बहुतांशी मी पायीच प्रवास करायचे. तेव्हा छत्री सांभाळत, हातातलं पुस्तक भिजू न देता, इतर लोकांना चुकवत तो रस्ता चालताना देखील वेगळीच