Skip to main content

आयुष्याशी बोलू काही...

मला उगाचच पटकन मनाला लावून घ्यायची सवय झालीय. फार लवकर वाईट वाटून घेते मी. यात तोटा माझाच होतो शेवटी. प्रचंड मानसिक तणाव राहतो मनावर बरेच दिवस, कधी कधी आठवडे देखील. मागच्या वर्षी तर खूप महिने प्रचंड दडपण आलं होतं मला. अभ्यासात देखील मग मन रमत नव्हतं. त्यामुळे एक फायदा असा झाला कि इथे मी ब्लॉग मात्र नियमितपणे करायला शिकले तेवढ्या अवधीत. आज घरातला पुस्तकांचा आणि वर्तमानपत्रांचा पसारा आवरताना मला बरीचशी जुनी कात्रणं सापडली. मी पार हरखून गेले सगळंच अधाशीपणे वाचण्याच्या नादात. लोकसत्ताच्या लोकरंग तसेच चतुरंग पुरवण्यांमधले अगणित लेख, टिपणं, आणि संग्रही केलेले भरमसाठ विशेष पुरवण्यांचे गठ्ठे! माझी आई नेहमीप्रमाणे मला ओरडली कि सगळं टाकून दे, गरजेपुरतच आता संग्रह आवरता घे. तेवढ्यात माझे डॅडी घरी आले आणि मी काढलेल्या मासिकांच्या गट्ठ्यांना ढूंढाळू लागले. मग काय आम्ही दोघं त्यात गर्क झालो तासभर. शेवटी हो नाही म्हणता म्हणता परत मोठा ढीग झालाच परत. मग जेवणानंतर मी मला वाचावेसे वाटणारे कात्रणं नि पुरवण्या हाताशी धरल्या आणि गुंगून गेले सगळ्यात. खरंच! आपण आयुष्यात किती गोष्टींचा संग्रह करतो. कधी आनंदाने, कधी नाईलाजाने, कधी हिरमुसले होऊन तर कधी अगदी रागाने सुद्धा. सगळं आपल्या जवळ ठेवण्याचाही किती अट्टहास धरतो आपण. मग वर्षागणिक त्या सगळ्यांचं ओझं देखील सांभाळायला लागतो. कित्येकदा आपल्याला माहित देखील नसतं, आपण काय आणि कसले संग्रह जमवून ठेवले असतात. मग असंच एखाद्या दिवशी बसतो आणि सगळं परत उकरून काढतो आपण. शेवटी, भावनेच्या आहारी जाऊन सगळं परत गुंडाळून ठेवतो एखाद्या दृश्य आणि अदृश्य पोतडीत. किती मनात विचार रुंजी घालतात भूतकाळातल्या अगणित गोष्टींबद्दल. काल परवाच, कॉलेज मध्ये असताना मला आवडणाऱ्या एका चार मैत्रिणींची कथा सांगणाऱ्या सिनेमातलं गाणं माझ्या डोक्यात दिवसभर पिंगा घालत होतं. अगदी शब्दनशब्द मला लक्खपणे आठवत होतं. मग मी युट्युब वर शेवटी बघितलंच ते आणि इतक्या वर्षांपूर्वी एका रणरणत्या दुपारी मी महिन्याच्या त्या उन्हाळी सुट्टीत घरी लॅपटॉप वर बघितलेल्या त्या सिनेमातलं प्रत्येक दृश्य माझ्या डोळ्यांसमोरून लगेच क्षणार्धात तरळून गेलं. इतका प्रत्यक्ष अनुभव या पूर्वी खचितच मी कधी अनुभवला असेल.  मनाला गंमत वाटली ती हि कि आठ वर्षांपूर्वी पाहिलेल्या एखाद्या चित्रपटातील विषय माझ्या मनावर किती खोल परिणाम करून गेला आणि मला पुसटपणे त्याची जाणीव देखील झाली नाही किंवा इतक्या वर्षात काही उणीव देखील भासली नाही. खरंच परिपूर्ण आयुष्य जगतेय का मी? 

एक गोष्ट मी जाणली कि आपल्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या- वाईट दोहो प्रकारच्या घटनांना आपण फार वेळ कुरवाळून ठेवत नाही. काही वर्षात ते विस्मृतीत जातात. आपलं जगणं कुठेच खुंटत नाही त्या स्मृती सतत आपल्या भवती नसल्यामुळे. काही दिवस लक्ष असतंच आपलं, पण मग नंतर आपण रमतो आपलय रोजच्या जीवनातला आनंद शोधण्यामध्ये. मला हे सगळं इथे व्यक्तं करताना देखील किती मोकळं वाटतंय. उगाच मनात कोंडमारा करून स्वतःचीच घुसमट करत जगण्यात काय अर्थ आहे? जे समोर आहे त्यालाच चांगला आकार देऊन आपला प्रत्येक क्षण जगण्यात जी मजा आहे ती इतर कुठल्याही भौतिक सुखात नाही. मी पूर्वी फार लवकर चिडायचे छोट्या छोट्या माझं मन मला सांगणाऱ्या गोष्टींवरून. अजूनही माझी चिडचिड होतेच पण ती बव्हंशी माझ्या मनातली गोंधळामुळे नाही तर त्या सगळ्यावर माझा अजूनही ताबा नाही, या कारणास्तव. मी स्वतःला वेगळीच भासत जाते प्रत्येक क्षणागणिक. पूर्वीसारखा फार माझा मित्र-मैत्रिणींचा गोतावळा आता राहिला नाहीये त्यामुळे अचानक एखाद्या दिवशी WhatsApp उघडल्यावर घडाघडा वाढत जाणाऱ्या त्या मेसेजेसची ती शेपूट बघून मला खुद्कन हसू फुटतं. आपण किती समाजप्रिय प्राणी आहोत याचे धडे लहानपणापासूनच शाळेत गिरवत आलो आहोत. त्यामुळे आता इतक्या सहजासहजी उपलब्ध असणाऱ्या या संवादाची खरच आपण पोचपावती करतो का हे बघायला हवं. शेवटी आपण शब्दांसाठी आसुसलेले असतो. क्षणोक्षणी. 

शब्दांचं इतकं सहजपणे आपल्या आयुष्यात टिकून राहण्याला फार गहिरा अर्थ आहे. कधीतरी आपण फार तुटकपणे शब्दांचा वापर करून एखाद्याला कायमचंच दुखावतो आणि कधी तर मधात घोळवून गोड करून फार रसरशीत आठवणींमध्ये त्यांचं रूपांतर करून टाकतो. माझी आईची मावसबहीण अर्थात माझी मावशी फार अल्लडपणे, प्रेमाने मला आणि इतर भावंडांना लहानपणापासून भेटत आली आहे. तिचा प्रत्येक शब्दं म्हणजे एखादा गोड पदार्थ, इतकी ती निर्मळ मनाने कोणाशीही बोलते. तिची वेदना सुद्धा एखाद्या कंकणाप्रमाणे नाजूकपणे आपले अस्तित्व टिकवते. अशा मधुर स्वभावाच्या लोकांमध्ये राहिल्याने आपल्यात सुद्धा थोडाफार गोडवा येतोच. 

माझा वाढदिवस मी नुकताच आठवड्याभरापूर्वी साजरा केला. खरं म्हणजे, विशेष काहीच केलं नाही. त्या दिवसाबद्दल मला फारसं गम्य पण वाटलं नाही. पण तो दिवस सरून गेल्यावर मात्र मला, मी कशाला तरी मुकले असं वाटायला लागलं. आपण हा दिवस देखील रोजच्याप्रमाणेच जगलो याची मला खंत वाटली. मग मी दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच लायब्ररीत गेले आणि जी. एंची निवडक पत्रे हे मौजचं पुस्तक घेऊन आले. ते वाचता वाचता त्या टळटळीत दुपारची मी मनातल्या मनात तुलना करू लागले. अगदी दहा वर्षांपूर्वी मी इतक्याच दुपारी ट्रेन मध्ये पुस्तकं वाचायचे आणि झोप काढायचे. कॉलेजवरून घरी परतताना कसलंच ओझं नसायचं. त्या क्षणात ते जगणं चाललं होतं. आता मात्र, प्रत्येक सेकंदाची मला प्रकर्षाने जाणीव असते. माझी मैत्रीण मला म्हणते, तूला इतकं फोकस्ड राहायला कसं जमतं? आणि मी हसून म्हणते, मी प्रत्येक क्षणात जगते. पण खरंच मी ते करते कि केवळ माझ्या मनाची समजूत आहे ती? आपल्या मनात किती गोष्टी सतत घोळत असतात!! 

व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतात ते उगाच नाही. सध्या किंडल मुळे माझं वाचन प्रचंड वाढलंय. हाताशी एक पुस्तक आहे माझ्या शिवाय, किंडल वर रोज मी एक पुस्तक वाचून संपवतेय. इतका वाचनाचा फाफटपसारा पूर्वी नव्हता माझा. पण हे देखील मला आवडतंय. ललित लेखन आणि त्यातले मनाला समृद्ध करणारे लिखाणातले विचार धन मी जपतेय. अक्षरशः रोज काहीतरी नवीन माझ्या डोक्यात उरतंय आणि त्यामुळे स्वतः बद्दल उगाच कीव आणणाऱ्या गोष्टींपासून मी दूर राहते. आपलं जीवन आपल्या तत्त्वांनुसार मार्गक्रमण करण्यासाठी लागणारी आंतरिक उर्मी आणि इच्छाशक्ती मला वाचनातून नेहमीच मिळत आली आहे. कधीतरी मी देखील दुःखाला भुलते आणि खूप वेळ त्या नकारात्मक चक्रात फिरत राहते पण शेवटी त्यातून बाहेर पडण्याची धडपड माझी मीच करते. आणि हि ऊर्जा सगळ्या चांगल्या-वाईट अनुभवांच्या घुसळणीतून मी मिळवली आहे. माझ्यासारख्या इतरही आयुष्याशी बोलू काही म्हणणाऱ्या आणि सतत संवाद घडवत आणणाऱ्या सगळ्या तरुणांना माझा सलाम. Amen. 

Comments

Popular posts from this blog

या जन्मावर, या जगण्यावर...शतदा प्रेम करावे?

पुस्तकांच्या आणि निसर्गाच्या साथीत जेवढा वेळ छान जातो आणि सार्थकी लागल्यासारखा वाटतो तितका खचितच कुठेतरी अन्यत्र वाटतो. नवीन वर्षात केलेल्या संकल्पांपैकी एक म्हणजे वाचलेल्या प्रत्येक पुस्तकावर स्वतःचं विवेचन लिहिणं. सुरुवात तर झाली आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आणि वर्ष अखेरीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या बऱ्याच बुक स्टोर्सनी भर भक्कम डिसकाउंट जाहीर केला होता. मी देखील नाही नाही म्हणता लोभाला भुलून पार ATM मध्ये जाऊन पैसे काढून पुस्तकं खरेदी केलीत वर्षाच्या शेवटच्या दिवशी. टिव्ही वरच्या असंख्य कार्यक्रमांवर नजर फिरवल्यास असं चित्र दिसतं कि समाजाच्या नैतिक मूल्यांशी कार्यक्रम बनवणाऱ्यांच काहीच घेणं-देणं दिसत नाही. माणसांची पतच एवढी रसातळाला गेली आहे कि कपोलकल्पित आणि वास्तव जग यांची चांगलीच सरमिसळ आपण करून ठेवली आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचे आपले काहीच मनसुबे वाटत नाही. आज सकाळी विचार करता करता माझ्या असं लक्षात आलं कि आपण किती उगाच खलबतं करतो, आपला दुरान्वये संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल. काल रात्री जेवताना मी कुमार केतकरांचं "बदलते विश्व" हे साधारण दहा वर्षांपूर्व

गौरी देशपांडे आणि मी

आज २७ फेब्रुवारी. कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आणि मराठी भाषा दिवस. त्यानिमित्त मला आवडणाऱ्या एका मराठी लेखिकेच्या पुस्तकाचं विवेचन इथे करते. गौरी देशपांडे- मराठी वाचणाऱ्या साऱ्याच वाचकांना हे नाव जितकं परिचित आहे तितकच फार जवळचं देखील आहे. मी सर्वप्रथम गौरी देशपांडे यांची एक कथा शाळेत असताना अभ्यासली होती- कलिंगड. आणि कित्येक दिवस मी त्या कथेच्या पुढे अजून काही असेल का म्हणून उत्सुक आणि अस्वस्थ होते. दहावीत असताना वाचली होती म्हणून त्यांचं सर्व लिखाण वाचून काढायचं हे ठरवलं. पुढची चार- पाच वर्ष त्यांचं असं काही वाचनात आलं नाही. नंतर 'आर्किटेक्चर' शिकताना कॉलेजच्या ग्रंथालयात मराठी पुस्तकांचं कपाट दिसलं. आणि पाहिलं पुस्तक जे मी घेतलं नी वाचलं ते गौरी देशपांडेंचं 'मुंबई-तळेगाव-ग्रीस' असा प्रवास करणारी 'मुक्काम' हि दीर्घ कथा/कादंबरी. त्याचं दुसरं पुस्तक वाचलं ते म्हणजे 'आहे हे असे आहे', आणि त्यात मला परत एकदा सापडली ती 'कलिंगड' हि कथा. मी चार-पाच वेळा ते पुस्तक वाचून काढलं परीक्षा सुरु होण्याच्या काही दिवस आधी, एप्रिल मधेच आणि त्या कलिंगडाची

आठवणीतल्या पाऊस गोष्टी!

गेल्या आठवड्यापासून पाऊस सगळीकडे चांगलाच पडतोय आणि हळूहळू पावसावरचे लेख देखील वाचण्यात येऊ लागलेत. मला फार पूर्वीपासूनच पावसात भिजणं आवडत नाही. कॉलेजच्या दिवसांत देखील ट्रेनने प्रवास करताना अनेकवेळा चिंब भिजून त्या गर्दीत चढताना जीव नकोसा व्हायचा. मला सर्दी लवकर होते म्हणून देखील मी पावसात भिजणं कटाक्षाने टाळते. तर आज हा इथे लिहिण्याचा उहापोह यासाठी की एका मैत्रिणीने तिच्या पावसाळी दिवसांच्या भुट्टा खाणाऱ्या आठवणी लिहिल्यात आणि त्या वाचून मी देखील काही क्षण त्या सुंदर गतकाळात स्थिरावले.  एके दिवशी पावसात चिंब भिजून कॉलेजला पोहोचले तर तिथे आमचा स्टुडिओच गळत होता. सगळीकडे फरशीवर पाणी आणि त्या अंधारलेल्या जागेत आम्ही मिळेल त्या कोरड्या जागेत बसलेलो मला आजही लक्ख आठवतंय.  नंतरच्या आठवणी ह्या जेजेतल्या हिरव्या पटांगणावर पडणाऱ्या पाऊसधारा बघण्याच्या आणि नाचत उड्या मारत पावसाला चकवत स्टुडिओ ते कॅन्टीनला पळण्याच्या ह्या होत्या.  इंटर्नशिपच्या काळात व्हीटी ते कुलाबा बहुतांशी मी पायीच प्रवास करायचे. तेव्हा छत्री सांभाळत, हातातलं पुस्तक भिजू न देता, इतर लोकांना चुकवत तो रस्ता चालताना देखील वेगळीच