Skip to main content

ओळखीचं गाठोडं

एखादया सुंदर संध्याकाळी आपल्या जिवलग मैत्रिणीला भेटावं आणि सांगीतिक मैफिलीत रममाण होऊन निघावं आणि त्या आठवणींना सुंदर दुजोरा देत परत एकत्र घरी जाणं, यात अवर्णनीय आनंद आहे. मी तो कालच अनुभवला. मोकळ्या आकाशाखाली गारवा असलेल्या भव्य मैदानावर स्टेज समोर बसून शास्त्रीय नृत्याची मेजवानी आणि तितकंच उस्फुर्त असं वातावरण फारच छान अनुभूती देऊन गेला. सुरुवात शाळकरी मुलींच्या अतिशय लयबद्ध लेझीम नृत्याने झाली. आम्हा दोघींच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यातच ओळखीचे असे वाटणारे बरेच चेहरे डोळ्यासमोरून तरळून गेले. अवतीभवती असणारा लोकांचा सळसळता उत्साह आमच्यात देखील परावर्तित होत होता. ते तीन तास खूप आनंददायी क्षण देऊन गेले. मैत्रिणीला बऱ्याच दिवसात भेटले नव्हते. ती भेट झाली आणि पुस्तकांवर मनसोक्त चर्चा केली. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात कितीतरी गोष्टी राहून जातात. आम्ही एकमेकींना कितीही व्यस्त असलो तरी आठवणीने आवडलेलं शेअर करतो. कधीतरी बोलणं होत नाही, पण ती नाळ घट्ट जोडलेली असल्यामुळे विशेष असा काही आमच्या वागण्या- बोलण्यात फरक पडत नाहीच. हीच तर जीवच्च - कंठच्च मैत्रीची खूण.

अशा कित्येक ओळखींना आपण आयुष्यात थारा देतो. सगळेच बंध मजबूत निघत नाही पण किमान आपल्याला आपला आरसा दाखविणारे मित्रं मिळतातच, सगळ्यांना. तसंच कौटुंबिक नात्यांमध्ये सुद्धा हे परिमाण लागू होतं. ओळख नसणारे लोक एकत्र यॆतात, सोबत राहतात, मोठे होतात, सतत जीवन जगणं शिकतात म्हणून आपल्या संस्कृतीत कुटुंबाला अनन्यसाधारण महत्व दिलं गेलय. इतक्या सगळ्या आठवणी आपण आपल्या आयुष्यात जोपासतो आणि त्यांना एखाद्या अदृश्य गाठोड्यासारखं सतत मिरवत असतो. पूर्वीच्या काळी प्रवासाला निघणारे वाटसरू गाठोडं न्यायचे, सूटकेस इत्यादी प्रकार येण्याआधी. त्यात कपडे, जेवणाची शिदोरी असायची. अगदी लहान मुलांच्या गोष्टींच्या पुस्तकात देखील टोपीवाल्याच्या कथेत चित्रात त्याचं प्रवासी गाठोडं दिसतं. असा हा गाठोड्याचा प्रकार. जे हवं ते पटकन एखाद्या कापडात टाकायचं आणि त्या कापडाचे सुटे टोक एकमेकांना घट्ट बांधायचे. असंच आपण आपलं आयुष्य जगतो. जे हवे ते अगदी घट्ट कुरवाळून मनाच्या गाठोड्यात बंद करून टाकतो. अनेक ओळखी, काही आयुष्यभर स्मरतात तर काही  वेळेच्या प्रवाहात विरून जातात. काही ओळखी सलतात तर काही निर्मळ आनंद देतात, प्रत्येक ओळखीचं एक स्वतंत्र अस्तित्व आणि त्या अस्तित्वाच्या मग हजार आठवणी. काही ओळखी ह्या तरल असतात, फक्त आपल्या स्मृतीत जिवंत राहतात. काही अस्तित्वात नसतात पण आपण त्यांना मनातल्या मनात जोपासतो आयुष्यभर. काहींना कुठलेच संदर्भ लागू होत नाहीत. काही कटू अनुभव देतात तर काही तितकाच लख्ख प्रकाश आपल्या आयुष्यात आणतात. ह्या सर्व ओळखींचं किती ओझं आपण बाळगत असतो, अनपेक्षितपणे. म्हटलं तर गाठोड्याच्याच स्वरूपात.  काय गंमत ना! आपल्या जगण्याच्या धावपळीत आपण कधी विचारच करत नाही आपल्याला किती लोक ओळखतात आणि आपण किती जणांना ओळखतो याचा. पण नक्की ओळख असणं म्हणजे काय? फक्त जुजबी एकमेकांच्याबद्दल माहिती याला ओळख म्हणता येईल का? परिचय असणं म्हणजेच ओळख का? मला आठवतं या बाबतीत एक किस्सा. तो असा कि एकदा अरुंधती रॉय यांच्या एका मुंबईतल्या व्याख्यानाला मी गेले होते. तिथे नंतर एका टेबलवर बसून मी त्यांचंच एक पुस्तक वाचत होते. अचानक एक माणूस माझ्या जवळ आला आणि म्हटला, "मी तुला ओळखतो!" मी अवाक झाले. कारण या आधी त्याला कधी पाहिल्याचं मला स्मरत नव्हतं. मी प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे बघितलं तेव्हा तो पटकन म्हणाला अमुक तमुक यांच्यासोबत आपण काही वर्षांपूर्वी भेटलो होतो. तेवढीच काय ती आमची ओळख. पण इतकी जुनी गोष्ट त्याने लक्षात ठेवली याचं मला इतकं अप्रूप वाटलं. आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी आपण लक्षात ठेवतो तसच ओळखीही. आज आमचा गाढा परिचय आहेच पण खूप चांगली ओळख देखील.

तर अशा या ओळखीच्या गाठोड्याबद्दल अनेकविध अनुभव. हा प्रवास सुरु होतो नकळतपणे. आपल्या स्ववत्वाच्या जाणीवेतून आणि जसजसे आपण मोठे होत जातो तसतसे निराळे अनुभव आणि ओळखीच्या जाणीवा देखील विस्तारित जातात. सगळा प्रवास शून्यातून सुरु आणि शून्यावरच अंत देखील. ओळखी मोडल्यावर सगळा पटच मिटला जातो का, सगळं मागचं पुसून स्वच्छ निरभ्र व्हावं आणि आपण नवीन ओळखींसाठी सज्ज व्हावं. म्हणून तर म्हणतात, झाले गेले विसरुनि जावे, पुढे पुढे चालावे! जीवनगाणे गातच रहावे!!!

Comments

Popular posts from this blog

या जन्मावर, या जगण्यावर...शतदा प्रेम करावे?

पुस्तकांच्या आणि निसर्गाच्या साथीत जेवढा वेळ छान जातो आणि सार्थकी लागल्यासारखा वाटतो तितका खचितच कुठेतरी अन्यत्र वाटतो. नवीन वर्षात केलेल्या संकल्पांपैकी एक म्हणजे वाचलेल्या प्रत्येक पुस्तकावर स्वतःचं विवेचन लिहिणं. सुरुवात तर झाली आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आणि वर्ष अखेरीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या बऱ्याच बुक स्टोर्सनी भर भक्कम डिसकाउंट जाहीर केला होता. मी देखील नाही नाही म्हणता लोभाला भुलून पार ATM मध्ये जाऊन पैसे काढून पुस्तकं खरेदी केलीत वर्षाच्या शेवटच्या दिवशी. टिव्ही वरच्या असंख्य कार्यक्रमांवर नजर फिरवल्यास असं चित्र दिसतं कि समाजाच्या नैतिक मूल्यांशी कार्यक्रम बनवणाऱ्यांच काहीच घेणं-देणं दिसत नाही. माणसांची पतच एवढी रसातळाला गेली आहे कि कपोलकल्पित आणि वास्तव जग यांची चांगलीच सरमिसळ आपण करून ठेवली आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचे आपले काहीच मनसुबे वाटत नाही. आज सकाळी विचार करता करता माझ्या असं लक्षात आलं कि आपण किती उगाच खलबतं करतो, आपला दुरान्वये संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल. काल रात्री जेवताना मी कुमार केतकरांचं "बदलते विश्व" हे साधारण दहा वर्षांपूर्व...

गौरी देशपांडे आणि मी

आज २७ फेब्रुवारी. कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आणि मराठी भाषा दिवस. त्यानिमित्त मला आवडणाऱ्या एका मराठी लेखिकेच्या पुस्तकाचं विवेचन इथे करते. गौरी देशपांडे- मराठी वाचणाऱ्या साऱ्याच वाचकांना हे नाव जितकं परिचित आहे तितकच फार जवळचं देखील आहे. मी सर्वप्रथम गौरी देशपांडे यांची एक कथा शाळेत असताना अभ्यासली होती- कलिंगड. आणि कित्येक दिवस मी त्या कथेच्या पुढे अजून काही असेल का म्हणून उत्सुक आणि अस्वस्थ होते. दहावीत असताना वाचली होती म्हणून त्यांचं सर्व लिखाण वाचून काढायचं हे ठरवलं. पुढची चार- पाच वर्ष त्यांचं असं काही वाचनात आलं नाही. नंतर 'आर्किटेक्चर' शिकताना कॉलेजच्या ग्रंथालयात मराठी पुस्तकांचं कपाट दिसलं. आणि पाहिलं पुस्तक जे मी घेतलं नी वाचलं ते गौरी देशपांडेंचं 'मुंबई-तळेगाव-ग्रीस' असा प्रवास करणारी 'मुक्काम' हि दीर्घ कथा/कादंबरी. त्याचं दुसरं पुस्तक वाचलं ते म्हणजे 'आहे हे असे आहे', आणि त्यात मला परत एकदा सापडली ती 'कलिंगड' हि कथा. मी चार-पाच वेळा ते पुस्तक वाचून काढलं परीक्षा सुरु होण्याच्या काही दिवस आधी, एप्रिल मधेच आणि त्या कलिंगड...

वेंधळेपणा

काही लोकांना वेंधळेपणा करण्याची एवढी सवय जडली असते कि कितीही त्यांनी काळजीने काम करण्याचा प्रयत्नापुर्वक निश्चय केला तरीही तो कधी तडीस जात नाही. मला माहित असलेल्या काही वेंधळ्या माणसांबद्दल सांगायचं झालं तर त्याचं प्रत्येक काम किंवा कृती हि इतरांसाठी तापदायकच ठरते बहुतेक वेळा. म्हणजे विद्यार्थ्यांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर त्यांना परीक्षेत अभ्यास आठवेल का याचं टेन्शन असतं पण तरीही त्यातल्यात्यात त्यांच्या वेंधळेपणात कुठेही कसूर रहात नाही. अगदी परीक्षेची सामग्री नीट घेण्यापासून ते ओळखपत्र, परीक्षेत व्यवस्थित पेपर लिहिण्यापर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये यांचा धांदरटपणा दिसून येतो. अशा लोकांच्या बेजबाबदार वागण्याची किंमत त्यांच्या परीजनांना भोगावी लागते याचं त्यांना सोयरसुतक देखील नाही. शेवटी काय तर माणूस स्वतःच्या स्वार्थाचाच विचार करतो. मला तर अतिशय राग आहे अशा लोकांच्या आप्पल्पोटेपणाची. त्यांच्या जगाचे ते राजे, सगळं भूमंडल फक्त यांच्या अवतीभवतीच फिरत असल्याचा यांचा फाजील गोड गैरसमज. आपल्यामुळे समोरच्याला केवढा मानसिक त्रास सोसावा लागत असेल याचा थांगपत्तासुद्धा अशा लोकांना नसतो मु...